निरुपयोगी शेतमालातून लाकडी विटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 09:12 PM2020-02-02T21:12:52+5:302020-02-02T21:14:01+5:30
कासोदा येथील तरुणाने कापूस वेचून रिकाम्या झालेल्या झाडांपासून कुट्टी करून प्रदूषण विरहित ब्रिकेट (बायोकोल) अर्थात लाकडी विटा बनवण्याचे काम सुरू केले आहे.
प्रमोद पाटील
कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथील तरुणाने कापूस वेचून रिकाम्या झालेल्या झाडांपासून कुट्टी करून प्रदूषण विरहित ब्रिकेट (बायोकोल) अर्थात लाकडी विटा बनवण्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांची कपाशीची झाडे उपटण्याची मजुरी तर वाचतेच, पण दररोज ४० ते ५० मजुरांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. सरकारचे ‘मेक इंन इंडिया’ यशस्वी होईल तेव्हा होईल पण आज या तरुणाने हा नवा व्यवसाय सुरू करून दगडी कोळशाला मोठा पर्याय स्वस्तात उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या तरुणाचे कौतुक होत आहे.
सध्या पावसाळा संपून कापूस वेचणी संपली आहे. कापसाची झाडे उपटून शेत रब्बीसाठी तयार करण्याची कामे जोरात सुरू आहेत. पण येथील समाधान शांताराम चौधरी या तरुणाने कपाशीच्या हिरव्या झाडांपासून ब्रिकेट बनवण्यासाठी एक छोटासा उद्योग सुरू केला आहे. टॅÑक्टरसोबत एक कुट्टी करण्याचे मशीन घेऊन सुमारे २० ते २५ मजूर घेऊन कापसाची झाडं असलेल्या शेतात जातो. तेथील सर्व झाडे (पºहाट्या) उपटून तेथे कुट्टी करण्यात येते. ही कुट्टी ब्रिकेट बनवण्याच्या कारखान्यात आणली जाते. त्यानंतर या कारखान्यात ब्रिकेट बनवल्या जातात. या ब्रिकेट बॉयलरसाठी वापरण्यात येतात. मोठमोठ्या कारखान्यात जेथे दगडी कोळसा वापरला जातो त्याला या ब्रिकेट पर्याय म्हणून वापरल्या जाऊ लागल्या आहेत. या ब्रिकेटचे वैशिष्ट्य असे की या ब्रिकेटपासून अजिबात प्रदूषण होत नाही. दगडी कोळसा दहा हजार रुपये टन विकला जातो. तर या ब्रिकेट पाच हजार रुपये टन विकल्या जातात. त्यामुळे यांना मोठी मागणी असते.
सुमारे २ लाख खर्चाचे कुट्टी मशीन व ५ लाख रुपयांचे ट्रॅक्टर व ब्रिकेट बनवण्यासाठी उभारण्यात येणारा २० लाख रुपये खर्चाचा छोटा कारखाना, अशा सुमारे २५ ते ३० लाख रुपये भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो. तालुक्यात अशी अभिनव कल्पना या तरुणाला सुचली व त्याने हे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. सुमारे सहा हजार चौरस फूट जागेतच ५० मजुरांना पोटापाण्यासाठी हा उद्योग सुरू झाला आहे. यात शेतातील पºहाट्या उपटण्याची मजुरी वाचत असल्याने शेतकरीदेखील खूश आहेत.
फक्त कापसाचे झाडेच नाहीत, तर मक्याचे भुट्टे, तुरीच्या काड्या, सोयाबीन, हरभरा या पिकांचे वेस्टेज मटेरियल आम्ही स्वखर्चाने उचलून घेऊन जातो. त्यापासून ब्रिकेट बनवतो. शेतकऱ्यांची मजुरी वाचते, म्हणून आम्हाला सर्वच शेतकºयांकडून निरोप येत असतात.
-समाधान शांताराम चौधरी, कासोदा