हरताळा, ता. मुक्ताईनगर : हरताळा फाटा येथील जागृत हनुमान मंदिर जीर्णोद्धार काम प्रगतिपथावर असून कळस कलाकृतीचे काम सुरू आहे.
येथील हरताळा फाट्यालगत असलेल्या व चौपदरीकरणाचे काम सुरू असताना येथील जुने मंदिर महामार्गाच्या चौपदरीकरणात येत होते. मंदिरासाठी हरताळा ग्रामपंचायतीने यासंदर्भात एकमताने ठराव केला. यासाठी जि.प.चे माजी सदस्य पूनमचंद जैन, आजाद गिरी महाराज, प्रदीप काळे, सोपान दांडगे आदींनी पुढाकार घेतला. गावातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मंदिर होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत तेथील जागेवर मागे सरकवत हरताळा शिवारातील कुंभारखान या जागेवर हे मंदिर आता बांधण्यात येत आहे. पूर्ण काम कळसापर्यंत व त्यावरील कलाकुसरीपर्यंत पोहोचले आहे. महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना जागृत हनुमान मंदिराचा झाल्यानंतर दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
गेल्या वर्षापासून सलग दुसरे वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंदिरावरील सर्वच कार्यक्रम बंद आहेत. हरिनाम सप्ताह, हरिपाठ वाचन, रामनवमी, एकादशी आदींसह प्रत्येक दिनाचे महत्त्व घेत येथे प्रत्येक वाटसरू, दिंडी असो एकादशी असो कोणत्याही कार्यक्रम असला तरी येथील पायवाटेने जाणारा व वाहनाने जाणारा प्रत्येक भाविक या मंदिरात हनुमान मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे मार्गस्थ होत नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती यातूनच व्यक्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. काही महिन्यांतच याचे काम पूर्ण होणार लवकरच होणार असल्याचे सेवेकऱ्यांनी सांगितले.