घनकचरा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:06+5:302021-07-03T04:12:06+5:30
जळगाव : शहरातील आव्हाणे शिवारातील मनपाचा घनकचरा प्रकल्प गेल्या ९ वर्षांपासून बंद असून, आता राज्य शासनाने नवीन प्रकल्पासाठीचा डीपीआर ...
जळगाव : शहरातील आव्हाणे शिवारातील मनपाचा घनकचरा प्रकल्प गेल्या ९ वर्षांपासून बंद असून, आता राज्य शासनाने नवीन प्रकल्पासाठीचा डीपीआर मंजूर केल्यावरदेखील अद्यापही या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. एकीकडे या परिसरातील नागरिक कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कोणतीही प्रक्रिया न होताच फेकण्यात आलेल्या कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे निघणाऱ्या धुळीमुळे त्रस्त आहेत. डीपीआर मंजूर होऊन आता महिना झाला असतानाही मनपाकडून प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. आधीच हे तब्बल दोन वर्षांपासून रखडलेले आहे.
पुन्हा पावसाने मारली दडी
जळगाव : जिल्ह्यात या आठवड्यात सुरुवातीचे काही दिवस हजेरी लावल्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. तीन दिवसांपासून जळगाव तालुका परिसरात पावसाने दडी मारली आहे. तीन दिवसांपूर्वी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. आता पेरण्या झाल्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांचा चिंतेत भर पडली आहे.
मनपा शिक्षकांकडून उपमहापौरांचा सत्कार
जळगाव : महापालिकेचे निवृत्त व कार्यरत शिक्षकांचे थकीत निवृत्तीवेतन आणि वेतन अदा करण्यात आल्याने गुरुवारी मनपा शिक्षकांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक इकबाल पटेल, हमीद शेख, मुनाफ शेख, अलहरुद्दीन शेख, मुजफ्फर खान आदी उपस्थित होते. मनपाच्या कार्यरत शिक्षकांचे १७ महिन्यांचे व सेवानिवृत्त शिक्षकांचे ७ ते ८ महिन्यांचे वेतन थकीत होते. थकीत वेतन मिळाल्याने महापालिकेच्या शिक्षकांची समाधान व्यक्त केले आहे.
खुल्या भूखंडावर घाणीचे साम्राज्य
जळगाव : शहरातील अनेक भागांत खुले भूखंड असून, या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तसेच पावसाचे पाणीदेखील साचत असल्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एसएमआयटी महाविद्यालय परिसरातदेखील एका भूखंडावर घाण पसरली असून, याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे.