ग्रामीण जीवनशैलीनं लिहितं केलं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 04:13 PM2018-07-09T16:13:11+5:302018-07-09T16:13:43+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात चाळीसगाव येथील कलाकार तथा शिक्षक दिनेश कृष्णाजी चव्हाण यांनी सांगितलेला आपला लेखन प्रवास...
‘शब्द कधी हसवतात’ शब्द कधी रडवतात
शब्दच आधार होऊनी शब्दच शब्द सुचवतात.’
शालेय जीवनात शिक्षण घेत असताना मराठी व हिंदी विषयाच्या कथा, कविता मला खूप आवडत. त्यातील प्रसंग, चित्रण नेहमी डोळ्यासमोर फिरायचे. कविता रस्त्याने गुणगणायचो. तेव्हा वाटायचं कवितेच्या छोट्या शब्दात किती मोठा आशय दडला आहे.
शि क्षणशास्त्र महाविद्यालय शहादा येथे (२०००-२००१) बी.एड.चे शिक्षण घेत असताना मराठी विषयासाठी प्रकल्प देण्यात आला. प्रकल्प हा ‘ग्रामीण जीवनशैली’ या विषयावर होता. त्यावेळी मी आदिवासी. पावरा समाजातील लोकांमध्ये मिसळलो. त्यांची दिनचर्या, त्यांची जीवनशैली स्वत: अनुभवली. त्यांची संस्कृती त्यातून झिरपणारे शब्द, काव्य, चित्र या साऱ्यांना अनुभवले. ते शब्द, ते चित्र काळजाला भिडलं.
त्यांचं वास्तव चित्रण मी प्रकल्पात शब्द-चित्रबद्ध केलं. तो प्रकल्प करीत असताना अंतर्मनातून अनुभवातून शब्दांना नव्हे तर शब्दांनी मला घडवले. शब्द सांगत गेले, मी लिहित गेलो. ते लिखाण, तो प्रकल्प जेव्हा पूर्ण झाला तेव्हा प्राचार्यांसह सर्वांनी माझे कौतुक केले आणि त्या वर्षाचा आदर्श विद्यार्थी शिक्षक हा पुरस्कार मला मिळाला. तेव्हापासून लिखाणाला वेळ मिळाले.
शालेय पाठ घेण्यासाठी मी जेव्हा कवितांची निवड करू लागलो तेव्हा अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ कवींंच्या कविता मी शिकवल्या. तेव्हा वाटलं. बघू या आपणासही काही सूचतं का? तेथून प्रभावित होऊन मला शिक्षणप्रणालीवर ‘शिक्षण सेवक’ कविता सुचली. गणपती महोत्सवाच्या वेळी गल्लीत कार्यक्रम दरवर्षी असतात, तेव्हा मीही कविता सादर केली. तेव्हा मला बºयाच प्रश्नांना सामोरे जावे लागले. तूच केलीस का? का कुणाची चोरली, मग कसं काय सुचली? पण मी तेव्हा खचलो नाही. हरलो नाही, नाऊमेद झालो नाही. आता आपण खरंच या प्रवाहात, शब्दांच्या सागरात थोडे पोहायला पाहिजे म्हणून पुन्हा या नकारात्मक अनुभवांनी लिहायला चालना मिळाली. रोज वर्तमानपत्र वाचण्याचा छंद असल्याने विषय सुचत गेले व परिसरातील विविध घटना, अनुभवातून काव्यनिर्मितीही होऊ लागली.
शेवटी एका प्रसिद्ध कवीने म्हटले आहे-
‘माझी अक्षरे मागती
प्रभो द्यावे वरदान
कवितेच्या कुशीमंधी
यावे सुंदर मरण.’’
तसं मलाही माझ्या ओळीतून वाटतं
‘शब्द सागराच्या प्रवाहात
नाव घेण्यास टाळू नका.
कलेत मी जीवन जगलो.
पण, कविता माझ्या जाळू नका.
-दिनेश कृष्णाजी चव्हाण, चाळीसगाव