भुसावळ : यावलमधील जगदीश कवडीवाले यांच्या सराफा दुकानावर टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणातील संशयित आरोपी मुकेश प्रकाश भालेराव यास भुसावळ तालुका पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याने तालुका पोलीस ठाण्यातील शौचालयात जाऊन अंगावर धारदार काचेने वार करून घेतल्याची घटना ३० रोजी ७.४० वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी मुकेशविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजारपेठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मुकेश प्रकाश भालेराव (26, बोरावल खुर्द, ता.भुसावळ, ह.मु. राहुलनगर, तापी नदी पुलाजवळ, भुसावळ) यास यावल पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर तालुका पोलिसांनी त्यांच्याकडील एका गुन्ह्यात शुक्रवारी सायंकाळी त्यास ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू केली. तेव्हा संशयिताने शौचाला जायचे असल्याचे सांगत तालुका पोलीस ठाण्यातील खिडकीच्या तुटलेल्या काचेच्या साहाय्याने पोटाच्या डाव्या व उजव्या बाजूस, तसेच छातीवर व दोन्ही मांडीवर दुखापत करून आत्महत्येचा प्रयत्न केला. काचेचा तुकडा शौचालयाच्या भांड्यात फेकून दिला. या प्रकारानंतर लागलीच संशयिताला भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. हवालदार प्रवीण युवराज पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयिताविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.
फोटो नंबर
०१ आरएमएम २२