वाळूचोरीच्या हव्यासापोटी तरुण चालकाने गमावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:27 PM2020-01-20T23:27:15+5:302020-01-20T23:27:32+5:30
चाळीसगाव - धुळे महामार्गावर अपघात : भरधाव ओमनीची एसटी बसला धडक
मेहुणबारे, ता.चाळीसगाव : चाळीसगाव-धुळे रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असताना एसटी बस व ओमनीची समोरासमोर धडक झाल्याने भोरस (ता. चाळीसगाव) येथील तरुण ओमनी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास दसेगाव फाट्यावर घडली.
चाळीसगाव-धुळे महामार्गावर उस्मानाबाद-सुरत ही (एमएसच २०, बीएस ३५२५) बस घेऊन चालक अमोल मुळे हे चाळीसगावकडून धुळ्याकडे जात होते. बसमध्ये २६ प्रवासी होते. रात्री सव्वा बाराच्या सुमारास दसेगाव फाट्याजवळ धुळ्याकडून चाळीसगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच २१, बी ३२८) या ओमनी गाडीने बसचालकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात ओमनीचालक गुलाब युवराज खैरनार (वय ४०) रा.भोरस (ता. चाळीसगाव) हा गंभीर जखमी झाला. त्यास वाहनातून चाळीसगाव येथे रूग्णालयात उपचारार्थ नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बस चालक अमोल मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत.
गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी होते. त्यामुळे रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर ओमनी वा इतर वाळू वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवली जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाळू चोरीच्या हव्यासापोटी आतापर्यंत अनेकांनी आपला जीव धोक्यात घातला तर काहींना जीव गमवावा लागला असल्याचे चित्र आहे.