महामार्गावरील घटना : डोक्यावरुन गेले चाक
फोटो जखमी व दुचाकी
जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने पुढे चालणाऱ्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली व त्यात डंपरचे टायर डोक्यावरुन गेल्याने श्याम सुरेश पाटील (३७, निवृत्ती नगर) हा तरुण जागीच ठार झाला तर परेश रवींद्र पाटील (२९, संभाजी नगर) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजता महामार्गावरील शिव काॅलनी थांब्याजवळ घडली. दरम्यान, या घटनेनंतर चालक डंपरसह पसार झालेला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,परेश पाटील व श्याम पाटील दोघेही मित्र असून दूध फेडरेशनमध्ये कामाला होते. मंगळवारी रात्री परेश हा टॉवर चौकात असताना श्याम पाटील याने '' मी जैनाबादमध्ये आहे मला घ्यायला ये '' असे सांगून परेशला बोलावून घेतले. तेथून परेशच्या दुचाकीने (एम.एच.१९ सी.टी.०५९१) श्याम याला निवृत्तीनगरात घरी सोडण्यासाठी जात असताना रात्री दहा वाजता महामार्गावर शिव कॉलनी थांब्याच्या अलीकडे एका हॉटेलजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या पिवळ्या रंगाच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात मागे बसलेला श्याम खाली फेकला गेला. त्यात श्यामच्या डोक्यावरुन टायर गेले तर परेश लांब फेकला गेला. या घटनेत श्यामचा जागीच मृत्यू झाला. तर परेशच्या उजव्या हाताला व डोक्याला मार लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच श्यामचा भाऊ अजय पाटील, राहुल पाटील, महेश पाटील, हितेश भदाणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने दोघांना जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविले. तेथे श्यामला मृत घोषित करण्यात आले तर परेश याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी सकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
*महामार्गावर डंपर घेताहेत बळी*
राष्ट्रीय महामार्गावर वाळू वाहतूक करणारे डंपर सुसाट वेगाने चालतात. जिल्ह्यात तीन महिन्यात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने ते पाच जणांचा बळी घेतला आहे. दोन महिन्यापूर्वी इच्छा देवी चौकात रेमंडच्या दोन कामगारांचा डंपर अपघातात बळी गेला होता.
*तीन महिन्यात महामार्गावर डंपरने घेतला यांचा बळी*
९ मार्च : सिद्धार्थ त्रंबक मोरे (५७, रा. सिंधी काॅलनी)
१९ मार्च : अक्षय विजय पाटील (३०, रा. शिवम नगर)
३ एप्रिल : ॲड. सतीश शंकर परदेशी (४३, रा. शिवाजी नगर)
३ एप्रिल : विनोद वेडू चौधरी (४२, रा. कुंभारखेडा, ता.रावेर)
११ मे : श्याम सुरेश पाटील (३७, रा. निवृत्ती नगर)