तरुणांचा पहिल्या दिवशी प्रतिसाद; महापालिकेची लस संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:53+5:302021-06-23T04:12:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात १८ ते २९ वयोगटाचे लसीकरण मंगळवापासून सुरू झाले असून, यात तरुणांचा पहिल्या दिवशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात १८ ते २९ वयोगटाचे लसीकरण मंगळवापासून सुरू झाले असून, यात तरुणांचा पहिल्या दिवशी सर्वच केंद्रांवर प्रतिसाद दिसून आला. शहरातील महानगरपालिकेतील सर्वच केंद्रावरील लस पहिल्याच दिवशी संपली. त्यामुळे बुधवारी चेतनदास मेहता केंद्रवगळता अन्य केंद्र बंद राहणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात एकत्रित ११ हजार २८८ तरुणांनी लस घेतली. यामुळे जिल्ह्यात एकाच दिवसात १७ हजारांवर लसीकरण झाले.
शहरात सद्य:स्थिती ५० टक्के ऑनलाइन व ५० टक्के ऑफलाइन असे लसीकरण होत आहे. शहराला महानगरपालिकेच्या केंद्राला दोन हजार डोस कोविशिल्डचे प्राप्त झाले होते. पहिल्या दिवशी सहा केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू होते. या ठिकाणी हा लस साठा संपला. यासह रेडक्रॉस केंद्रावर दुपारी १२ वाजेपर्यंत तरुणांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती. मात्र, केंद्र विभागले गेल्याने आता गर्दी टाळण्यात प्रशासनाला यश आल्याचे चित्र आहे. दुपारनंतर केंद्र ओस पडली होती.
..काही ठिकाणी गर्दी
शहरातील काही केंद्रांवर सकाळी काही प्रमाणात गर्दी उसळल्याने काहीसा गोंधळ झाला होता. मात्र, दुपारपर्यंत ही गर्दी कमी झाली होती. महापालिकेच्या केंद्रावर कोविशिल्डचा २०,३७४ जणांनी पहिला डोस घेतला, तर २७६ लोकांनी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला.