निंभोरा येथील कर्जबाजारी युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:08 PM2018-10-11T22:08:57+5:302018-10-11T22:10:52+5:30
निंभोरा ता.सोयगाव येथील युवकाने स्वत:च्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पाचोरा - शेतातील नापिकी व किरकोळ कर्ज यामुळे जीवन जगणे असह्य झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन निंभोरा ता.सोयगाव येथील युवकाने स्वत:च्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पंकज साहेबराव बोरसे (वय २२) याने गुरुवार ११ रोजी सकाळी ८ च्या सुमारास स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई, वडील भोळसर स्वभावाचे, प्रपंचाची जबाबदारी स्वत:वर असल्याने व्यवहार करणे शक्य नाही. त्यातच स्वत:ची जमीन तीन एकर नापिकीमुळे व किरकोळ कर्ज फेड यामुळे पंकज त्रस्त होता. त्यातूनच त्याने जीवन संपवले अशी माहिती नातेवाइकांनी दिली. मयताच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ बहीण आहे. याप्रकरणी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणला. याठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषित करीत शवविच्छेदन केले. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.