‘धुळमुक्त चाळीसगाव’ अभियानासाठी सरसावले युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:09 PM2018-03-10T13:09:54+5:302018-03-10T13:09:54+5:30
दोन दिवसात दोन ट्रॅक्टर धूळ संकलित
आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. १० - रस्त्यावरील दुभाजकांसह ठिकठिकाणी साचलेल्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. श्वसनाचेही विकारही बळावतात. शहराचे सौदर्य देखील धुळीने माखते. आम्ही चाळीसगावकर विकास मंचने यावर 'धुळमुक्त चाळीसगाव' हे अभियान ९ पासून सुरु केले असून यासाठी युवक मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. पहाटे पासूनच स्वच्छतेला सुरुवात केली जाते.
अभियान लोकसहभागातून राबविले जात आहे. सुरुवात शुक्रवारी साडेपाच वाजता न.पा.चे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर साहेब यांच्या हस्ते संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान राजपूत, सविता राजपूत, योगेश राजधार पाटील, राकेश बोरसे हे देखील सहभागी झाले. सिग्नल पॉईंट ते अंधशाळे पर्यंत स्वच्छता करण्यात आली.
शनिवारी अंधशाळेपासून भडगाव रोडवरील स्वच्छता मोहीम सुरु झाली. खरजई नाक्यापर्यंत दुभाजकातील घाण, वाळलेले गवत काढण्यात आले. यानंतर न.पा. कर्मचा-यांनी त्यावर पाणी मारुन स्वच्छता केली. गेल्या दोन दिवसात सिग्नल पॉईंट ते खरजनई नाका पर्यंतचा रस्ता चकाचक करण्यात आला. दुभाजकाच्या भोवती साचलेली दोन ट्रॅक्टर धुळ संकलित झाली.
आम्ही चाळीसगावकर विकास मंचचे राहुल वाकलकर, श्रीकांत राजपूत, स्वप्नील जाधव, किरण पाटील, सागर मोरे, आकाश पवार, पंकज पाटील, इशू वर्मा, राहुल जाधव यांनी हे अभियान सुरु केले असून त्यांना न.पा.चे आरोग्य निरीक्षक संजय गोयर आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभत आहे. अभियान सुरुच ठेवण्याचा निर्धार युवकांनी केला आहे. पुढच्या टप्प्यात हिरापूर रस्ता, सिग्नल चौक ते वीर सावरकर चौक हे रस्ते धुळमुक्त केले जाणार आहे. नागरिकांनाही सहभागी होण्याचे आवाहन आम्ही चाळीसगावकर मंचने केले आहे.