युवारंग युवक महोत्सवातून विद्यार्थी देताहेत सामाजिक संदेश, ज्वलंत विषयांना घातला हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:00 PM2018-02-12T13:00:57+5:302018-02-12T13:01:28+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय महोत्सव
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १२ - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठस्तरीय युवारंग युवक महोत्सवाला सोमवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला असून संगीत, नृत्य, साहित्यकला, नाटयकला व ललितकला या पाच कला प्रकारातील २५ उपकला प्रकारात होणाºया महोत्सवातून विद्यार्थी विविध सामाजिक संदेश देऊन लक्ष वेधून घेत आहे. पर्यावरण संरक्षण, जातीयवाद, दहशतवाद अशा ज्वलंत विषयांवरदेखील विद्यार्थी कला प्रकार सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या महोत्सावाचे सोमवारी विद्यापीठात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर हे उपस्थित होते.
सहा रंगमंच तयार
विद्यापीठाने २५ ते ३१ जानेवारी दरम्यान चार ठिकाणी जिल्हास्तरीय युवक महोत्सव घेतले. तेथील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांचा हा विद्यापीठस्तरीय महोत्सव होत आहे. यामध्ये ६० पेक्षाही अधिक महाविद्यालयांमधील जवळपास ८८३ जण सहभागी झाले असून त्यामध्ये ५९५ विद्यार्थी, १५७ संगीत साथीदार, १३१ संघव्यवस्थापक यांचा समावेश आहे.