जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या केवळ २३ कोटी ६० लाख रुपयांच्या तोट्यात आहे. त्यात एनपीए हा ११९ कोटी रुपयांचा आहे. तर सध्याचा नफा ९५ कोटी ७० लाख रुपयांचा आहे. एनपीएतून नफा वजा केला जात असल्यानेच हा तोटा दिसत असल्याची माहिती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिली. जिल्हा बँकेची सर्वसाधारण बैठक शनिवारी बँकेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
देवकर यांनी सांगितले की, बँकेत सध्या ३५२० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. शेतकरी सभासदांच्या पीक कर्ज योजनांसाठी राज्य सहकारी बँकेकडून ३४० कोटी रुपयांची कर्ज मर्यादा मंजूर होती. त्यात बँकेने वर्षभरात फेरउचल केलेली नाही. तसेच बँकेने या आर्थिक वर्षात ६०८ कोटी रुपयांचे पीक कर्ज स्वभांडवलातून उभे केले आहे. बँकेच्या थकबाकी कर्जाची वसुली १५ टक्के झाली आहे. त्यात नफा ९५ कोटी ७० लाख रुपयांचा असला तरी एनपीए ११९ कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे बँक सध्या २३ कोटी ६० लाख रुपयांच्या तोट्यात आहे, असेही त्यांनी सांगितले.
काही सभासदांनी विषयपत्रिका मिळालेली नसल्याची तक्रार केली होती. त्यात त्यांनी म्हटले की, विकासो प्रतिनिधींना अजेंडा थेट पाठवले होते. तर इतरांना टपालाने पाठविले होते. त्यातील २२०० पेक्षा जास्त विषयपत्रिका या पोस्टाच्या शिक्क्यानिशी परत आल्या आहेत. पीक विम्यातूनच कर्ज वसुली ८ सप्टेंबर रोजीच बंद केली आहे. त्यामुळे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. संगणक देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च हा मूळ रकमेच्या १६ टक्के आहे. त्यामुळे हा खर्च १ कोटी १३ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यात अतिरिक्त खर्च नाही. संचित तोटा भरून निघायला मात्र वेळ लागेल, असेही त्यांनी सांगितले.
अपहाराच्या रकमेबाबतही प्रश्न विचारला गेला. त्यात सांगितले की, ही रक्कम चार कोटी ७० लाख ७८ हजारांची आहे. ही सर्व प्रकरणे १९९२-९३ च्या दरम्यानची आहेत. त्यातील एक कोटीची रक्कम वर्षभरात वसूल होईल.
मसाकाच्या मुद्द्यावर सुरेश चौधरी यांनी प्रश्न विचारला त्यावर देवकर यांनी बँकेकडे एका संस्थेने प्रस्ताव दाखल केला आहे. हा प्रस्ताव आला की त्यावर विचार करूनच बँक त्याला मंजुरी देईल. मात्र, रिझर्व बँकेच्या नियमानुसार बँक कारखाना चालवू शकत नाही, असे सांगितले.