झिपरू अण्णा महाराजांचा आज पुण्यतिथी उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:44+5:302021-06-03T04:12:44+5:30
प्रसाद धर्माधिकारी नशिराबाद : ओमकार ध्वनी... श्रींच्या नामाचा जयघोष... शंखनाद...सनई चौघड्याचा मंगलमय स्वर... वेदमंत्रोच्चार... भक्तीत तल्लीन अशा भारलेल्या ...
प्रसाद धर्माधिकारी
नशिराबाद : ओमकार ध्वनी... श्रींच्या नामाचा जयघोष... शंखनाद...सनई चौघड्याचा मंगलमय स्वर... वेदमंत्रोच्चार... भक्तीत तल्लीन अशा भारलेल्या वातावरणात गेल्या आठ दिवसांपासून साधेपणाने सुरू असलेला ग्रामदैवत संत झिपरू अण्णा महाराज यांच्या ७२ व्या पुण्यतिथी सोहळ्याची गुरुवारी पालखीने सांगता होणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पाच पावले पालखी काढून मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा करीत उत्सव साजरा केला जाणार आहे.
अण्णांनी घराची कडी ठोकली म्हणजे भाग्याचा दिवस
संत झिपरू अण्णा महाराज मूळचे नशिराबादचे. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १८७७ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव कासाबाई (सावित्रीबाई) तर वडिलांचे नाव मिठाराम होते. त्यांना एक भाऊ, एक बहीण होती. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. पत्नीचे नाव मथुराबाई (कस्तुराबाई) होते. वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत अण्णा महाराजांनी विणकाम केले. त्या काळी नशिराबाद विणकामात महाराष्ट्रात प्रसिद्ध व अग्रेसर होते. झिपरू अण्णा महाराजांचे अण्णा हे टोपण नाव होते. समाधी मंदिराजवळ असलेल्या शनी मंदिरातील कल्याणदास महाराज यांच्याशी अण्णा महाराजांचा परिचय झाला. कल्याणदास महाराजांनी झिपरू अण्णा महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना दीक्षा दिली. तेव्हापासून ते विरक्त झाले. गुरु-शिष्याचे नाते निर्माण झाले व ते पूर्ण ब्रह्म चिंतनात राहू लागले. त्याचवेळी थोर संत वैरागी म्हणून अण्णांचा लौकिक सर्वत्र भूतलावर पसरत गेला. घराची व संसाराची तमा न बाळगता अण्णा महाराज वैराग्य स्थितीत राहू लागले. अंगावरील कपड्यांचा त्याग करून ते दिगंबर अवस्थेत राहू लागले. काही दिवसात त्यांचे साक्षात्कार, चमत्कार दिसायला लागले. यावरून सर्वजण त्यांना संत सिद्धयोगी मानू लागले. गावात कुठेही जावे भाकरी मागावी, त्यात थोडी खावी व थोडी शिल्लक ठेवून ती पशुधनाला खाऊ घालावी अशी भूतदया श्रींच्या अंगी होती व असा त्यांचा दिनक्रम होता. श्रींच्या कृपेने हजारो भाविकांचे भाग्य उजळले असल्याचे अनेक जाणकार सांगतात. अण्णांनी घराची कडी ठोकली म्हणजे तो दिवस भाग्याचा ठरत असे.
महाराजांच्या अंत्ययात्रेला वरुण राजाची हजेरी
२१ मे १९४९ ला वैशाख वद्य नवमीला महाराजांचे निर्वाण झाले. कै.भैयाजी हनुमंत कुलकर्णी उर्फ भैया मास्तर यांच्याकडे अण्णा महाराजांचे आयुष्य गेले. त्यांच्याकडे महाराजांचे वास्तव्य होते. वैशाखातील रणरणत्या उन्हात महाराजांच्या अंत्ययात्रेत पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. माझा देह पूज्य गुरु कल्याणदास महाराजांच्या मठाजवळ ठेवावा, अशी अण्णा महाराजांची इच्छा होती. त्यानुसार त्यांचा देह मठाजवळ ठेवण्यात आला. समाधी बांधण्यात आली. त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम त्यांच्या निर्वाण दिनापासून आयोजित केला जातो. १५ फेब्रुवारी १९७९ ला जयपूर येथून आणलेल्या श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कानळदा आश्रमातील चंद्रकिरण महाराज यांच्याहस्ते झाली होती.
देश-विदेशातील भाविक नतमस्तक
श्रींच्या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार गुरुदेव सिद्धपीठ गणेशपुरी व झिपरू अण्णा महाराज स्मारक समितीच्या सहकार्यातून झाला. समाधी मंदिरावर २१ फूट उंचीचा कळस व भव्य सभामंडप आहे. परिसरात भक्त निवास कार्याची भव्य निर्मिती पूर्ण होत आहे. वाकी नदीकाठावर अण्णा महाराजांचे भव्य नयनरम्य समाधी मंदिर आहे. अण्णा महाराजांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील लाखो भाविक येतात. अमेरिका, जर्मनी, स्पेन आदी ठिकाणचे भाविक येथे येऊन गेले. येथे आले की ते नतमस्तक होतात आणि मन: शांतीची प्रार्थना करतात. श्रीं ना भजी, पिठलं, भाकरी अत्यंत प्रिय असल्यामुळे अनेक भाविक श्रीं ना भजे, बिडीचा नैवेद्य अर्पण करतात. दर गुरुवारी या ठिकाणी पिठलं-भाकरीचा महाप्रसादही भाविकांना देण्यात येतो.
सलग दुसऱ्या वर्षी साधेपणाने उत्सव
गेल्या वर्षापासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन व निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर यंदाही गत वर्षाप्रमाणे श्रींचा पुण्यतिथी उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. गेल्यावर्षी श्रींची पालखी मिरवणूक निघालीच नाही. यंदाही मंदिराच्या गाभाऱ्यात पाच पावले पालखी काढून उत्सवाची साधेपणाने सांगता करण्यात येणार आहे, अशी माहिती झिपरू अण्णा महाराज स्मारक समितीने दिली. यशस्वीतेसाठी झिपरू अण्णा महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहे.