नशिराबाद : नवीन प्लॉट एरियासह अन्य काॅलन्यांमधील गटारीचे व सांडपाणी लक्ष्मीनगरकडे नको, अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही समांतर सुनसगाव रस्त्याच्या मार्गाने गटारी काढा. मात्र, त्यालाही शेतकऱ्यांच्या विरोध होत असल्यामुळे नेमके आता गटारी काढायची कशी, असा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी या परिसरात गटारी बांधकामाच्या मोजमाप करण्याकरिता आले असताना, लक्ष्मीनगरातील नागरिकांनी त्यांना विरोध दर्शवून मोजमाप करू न देता माघारी पाठविले.
लक्ष्मीनगर परिसरात तीर्थक्षेत्र स्वामी समर्थ केंद्र आहे. या परिसरात दत्तनगर, द्वारकानगर यांच्यासह अन्य पाच ते सहा काॅलनीचे सांडपाणी, गटारीचे पाणी लक्ष्मीनगर परिसरात तुंबत असल्याने, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी इकडे नको, दुसरा मार्ग शोधा, अशी मागणी लक्ष्मीनगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे. गटारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरिकांची बैठक घेऊन, त्यावर तोडगा काढण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बापू चौधरी, राहुल चौधरी, भूषण साळुंखे, नरेंद्र निकम, पिंटू पवार, रवींद्र लोहार, सोपान माळी यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे.
समांतर गटारीची मागणी
सुनसगाव रोडला समांतर गटारी करा, अशी मागणी लक्ष्मीनगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे. मात्र, याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. पूर्वीपासून गटारीचे पाणी तापीच्या दिशेने जाते, त्यामुळे इकडे नवीन गटारी खोदू नका, असा पवित्रा शेतकरी वर्ग घेत आहे.
पंधरा लाख खर्चून गटारीचे काम
या परिसरातील गटारीचा प्रश्न मार्गी लागावा, म्हणून जिल्हा परिषदेकडून १० ते १५ लाख रुपयांच्या पक्क्या गटारी बांधकाम करण्यात येत आहे. लक्ष्मीनगर परिसरातून नैसर्गिक प्रवाह गटारीचा असल्यामुळे त्याच मार्गाने गटारी करण्याचे नियोजन आहे. त्या परिसरात सुमारे एक ते दीड मीटर आरसीसी ढापे टाकण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी दिली.