नेपोलिअन बोनापार्टने जेथे शेवटचा श्वास घेतला ते विमानतळ आता येणार वापरात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 04:58 PM2017-10-16T16:58:36+5:302017-10-16T17:09:00+5:30
कित्येक वर्षांपासून रखडलेल्या येथील विमानतळाचे काम पूर्ण झाले असून पहिल्या विमानाने यशस्वी उड्डाणही झाले आहे.
फ्रेंच सम्राट नेपोलिअन बोनापार्ट यांनी ज्याठिकाणी शेवटचा श्वास घेतला ते ठिकाण आता पूर्वीपेक्षा अधिक प्रसिद्ध होणार आहे. कारण कित्येक वर्षांपासून रखडलेल्या येथील विमानतळाचे काम पूर्ण झाले असून पहिल्या विमानाने यशस्वी उड्डाणही झाले आहे. साऊथ अॅटलँडच्या अगदी मध्य भागात असलेल्या आईसलँडवरील सेंट हेलेना या विमानतळाला अखेर ब्रिटेनच्या प्रशासनाने मान्यता दिल्याने तेथील स्थानिकांनी आणि प्रवाशांनी एकच जल्लोष केला आहे.
डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल डेव्हलोपमेंटमार्फत २८५ मिलिअन पौंड खर्च करून हे विमानतळ बांधण्यात आलं होतं. या विमानतळाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही वर्षभर हे विमानतळ बंद अवस्थेत होतं. त्यामुळे ‘निरुपयोगी विमानतळ’ असंही या विमानतळाला म्हटलं जातं. खराब हवेमुळे या विमानतळावरील उड्डाणं बंद करण्यात आली होती. अखेर विमानतळाला मान्यता मिळाल्यानंतर एअरलिंक एम्ब्रेरर ई-१९०-१०० आय जी. डब्ल्यू एअरक्राफ्ट या विमानाने शनिवारी दुपारी १.१५च्या दरम्यान उडाण घेतलं.
सेंट हेलेना विमानतळाच्या आजूबाजूला ४५०० लोकांची वस्ती आहे. १६५८ पासून येथे ब्रिटिशांची वस्ती आहे. १९३० पासून येथे विमानतळ होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यानंतर बऱ्याच काळाने विमानतळाचे काम हाती घेण्यात आले आणि शेवटी २०१६ साली विमानतळ आणि धावपट्टी पूर्ण झाली. मात्र हवेतील बदलांमुळे या उडाणाची ट्रायल घेणे अशक्य झाल्याने विमानतळाचे उद्घाटन लांबले होते. वर्ष होऊनही या सेवेचा फायदा घेता येत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक माध्यमांनी या विमानतळाला निरुपयोगी विमानतळ म्हणून हिणवलं. शेवटी ब्रिटन प्रशासनाने विमानतळ खुले करण्याची परवानगी दिली आणि याचे उद्घाटन करण्यात आले.
१०० प्रवाशांची क्षमता असलेल्या विमानात केवळ ६८ प्रवाशांनीच प्रवास केला. हवेतील बदलामुळे विमानातील वजनावर मर्यादा आल्या त्यामुळे फक्त ६८ प्रवाशांनाच येथे मुभा देण्यात आली. सेंट हेलेना विमानतळावर विमानाने पहिल्यांदा उड्डाण घेतल्यावर स्थानिकांच्या आणि प्रवाशांच्या अश्रुंचा बांध फुटला. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले हे विमानतळ अखेर सुरू झाल्याने तेथील स्थानिकांनी एकच कल्लोळ माजवला.
सर्व फोटोज - www.mirror.co.uk