लठ्ठ प्रवाशांशेजारी बसवल्याने अमेरिकन एअरलाईन्सवर खटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 01:23 AM2017-05-08T01:23:36+5:302017-05-08T01:23:36+5:30
दोन लठ्ठ प्रवाशांशेजारी बसवल्यामुळे आॅस्ट्रेलियन प्रवाशाने अमेरिकन एअरलाईन्सवर खटला भरला आहे. या लठ्ठ प्रवाशांमुळे मला
दोन लठ्ठ प्रवाशांशेजारी बसवल्यामुळे आॅस्ट्रेलियन प्रवाशाने अमेरिकन एअरलाईन्सवर खटला भरला आहे. या लठ्ठ प्रवाशांमुळे मला गंभीर दुखापत झाली, असा मायकेल अॅन्थोनी टेलर (वुलोंगगोंग, न्यू साऊथ वेल्स, आॅस्ट्रेलिया) यांचा दावा आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानातून हिथ्रो विमानतळावर मायकेल यांना उतरवण्यात आले. त्यांना डिसेंबर २०१५ मध्ये सिडनी ते लॉस एन्जिलीस या प्रवासासाठी खिडकीकडील जागा मिळाली होती. न्यायालयीन कागदपत्रांवरून असे दिसते की, अति वजनाचे दोन प्रवासी मायकेल यांच्या रांगेत बसले होते आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या शरीराने त्यांच्या अंगावर अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणामुळे मला उभे राहावे लागले, वाकावे लागले, अंग चोरून व एका बाजूला व पुढे वाकून बसावे लागले. त्यामुळे माझ्या शरीराला पिळे पडले, असे मायकेल यांचे म्हणणे आहे. टेलर यांना आधीच पाठीच्या दुखण्याचा त्रास असून, या लठ्ठ प्रवाशांमुळे तो जास्त झाला आहे व अजिबात सोयीच्या न ठरलेल्या त्या विमान प्रवासामुळे मानेलाही वेदना होत आहेत. मायकेल यांनी जागा बदलून मिळण्याची केलेली विनंती अनेक वेळा फेटाळण्यात आली, असे त्यांचे वकील थॉमस जानसेन यांनी म्हटले. मायकेल यांनी अमेरिकन एअरलाइन्सकडे एक लाख आॅस्ट्रेलियन डॉलर्सची (५७,४०० पौंड) नुकसानभरपाई मागितली आहे. ज्या दोन प्रवाशांमुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल मला कोणताही आकस नसल्याचेही मायकेल म्हणाले.