कॅलिफोर्निया: चोरानं मोठी रोकड लांबवल्याच्या, मौल्यवान वस्तू लंपास केल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. मात्र कॅलिफोर्नियात एक अजब प्रकार घडला आहे. एक चोर एक बॅग घेऊन पसार झाला. मोठी रोख रक्कम हाती लागेल, या आशेनं पळवलेल्या बॅगेत चोरानं हात घेतला आणि त्याला चोरीचा चांगलाच पश्चाताप झाला.आपली बॅग चोरीला गेल्याची तक्रार कॅलिफोर्नियातील सर्पमित्र ब्रायन गंडी यांनी दिली आहे. रोख रकमेसाठी चोरानं बॅग पळवली असावी. मात्र ती बॅग पूर्णपणे सापांनी भरलेली होती, असं सर्पमित्रानं सांगितलं. ब्रायन सापांचं संवर्धन करतात. याशिवाय सापांची विक्री करण्याचा त्यांचा अधिकृत व्यवसायदेखील आहे. शहरातील मार्टिन ल्युथर किंग वाचनालयात सापांबद्दलचं एक व्याख्यान देऊन ब्रायन त्यांच्या घरी परतत होते. त्यावेळी पार्किंगमधील गाडी आणायला जात असताना त्यांनी बॅग पार्किंग झोनच्या बाहेर ठेवली. त्यावेळी बॅगजवळ कोणीच नसल्याचं पाहून एका चोरानं त्यांची बॅग लांबवली. ब्रायन काही वेळानं बॅग ठेवलेल्या ठिकाणी आले, त्यावेळी त्यांना बॅगेतील दोन साप जमिनीवर दिसले. मात्र त्यांची बॅग तिथे नव्हती. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीतील दृश्यांच्या मदतीनं चोर सापडेल, अशी आशा ब्रायन यांनी व्यक्त केली.
बाप रे बाप... पळवलेल्या बॅगेत चोरानं घातला हात अन् डोक्याला झाला ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 5:17 PM