लग्नात मित्र, नातेवाईक आणि परिवारातील लोकांशिवाय अजिबात मजा येत नाही. लग्नात सगळेच नवरी-नवरदेवासाठी गिफ्ट आणतात. या गिफ्टमुळे नवरी किंवा नवरदेवाकडील लोक अनेकदा नाराज झाल्याच्या घटना तुम्ही वाचल्या असतील. पण कधी गिफ्टमुळे लग्न कॅन्सल झाल्याचं ऐकलं नसेल. पण अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना आहे कॅनडातील.
मनासारखं गिफ्ट न मिळाल्याने कॅनडात राहणारी सुसनने आपलं लग्न कॅन्सल केलंय. सुसनच्या चुलत बहिणीने सोशल मीडियावरून हे लग्न कॅन्सल झाल्याची माहिती दिली. ही पोस्ट बघता बघता व्हायरल झाली.
सुसनने पाहुण्यांसमोर लग्नात गिफ्टऐवजी कॅश देण्याची डिमांड ठेवली होती. सुसन आपल्या लग्नातून ६० हजार डॉलर जमा करून त्याच पैशातून ती स्वत:चं लग्न करणार होती. मात्र, पाहुण्यांनी सुसनच्या या अपेक्षांवर पाणी फेरलं. त्यामुळे सुसनला आपलं लग्न कॅन्सल करावं लागलं.
सुसनचा होणारा पती या घटनेमुळे फार दु:खी आहे. त्याचं म्हणणं आहे की, काही कारणांमुळे त्याचं आणि सुसनचं लग्न होऊ शकलं नाही. यासाठी त्याने मित्रांना आणि नातेवाईकांना जबाबदार ठरवलं आहे.
सुसनने लग्न कॅन्सल झाल्यावर सोशल मीडियावर आपलं मन मोकळं केलंय. सुसनने लिहिले की, 'आम्ही दोघे सोबत काम करत असताना प्रेमात पडलो होतो. त्यावेळी आमचं वय १४ वर्षे होतं. त्यानंतर १८ व्या वर्षी आम्ही साखरपुडा केला. २० वर्षांची असताना मी आई झाले आणि आम्ही सोबत जगण्याचा निर्णय घेतला. पण आमच्या लग्नासाठी आमच्याकडे केवळ १५ हजार डॉलर होते. आम्हाला चांगलं लग्न करण्यासाठी ६० हजार डॉलरची गरज होती. त्यामुळे मित्रांना आणि नातेवाईकांना सांगितलं होतं की, आम्हाला लग्नात गिफ्टऐवजी कॅश द्या. पण मित्रांनी आणि नातेवाईकांनी असं केलं नाही. त्यामुळे आम्हाला लग्न कॅन्सल करावं लागलं'.