वॉशिंग्टन: तुम्ही कधी पैशांचा पाऊस पडताना पाहिला आहे का ? अमेरिकेत चक्क पैशांचा पाऊस पडला आहे. अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर पैशांचा पाऊस पडला आहे. या घटनेचा व्हिडिओही सध्या प्रचंड व्हायरल होतोय. रस्त्यावर पडलेल्या या पैशांना गोळा करण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली. प्रत्येकजण रस्त्यावर पडलेल्या नोटा उचलताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 9.15 दक्षिण कॅलिफोर्नियाताली एका महामार्गावर एक ट्रक सॅन दिएगोहून फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पकडे जात होते. या ट्रकमध्ये अनेक पैशांनी भरलेल्या पिशव्या ठेवल्या होत्या. ट्रक वेगात असताना अचानक या पैशांच्या पिशव्या फाटल्या आणि या रस्त्यावर पैशांचा पाऊस पडणे सुरू झाले. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दूर-दूरवरून लोक पैसे गोळा करण्यासाठी येत आहेत.
रसत्यावर पडलेल्या बहुतांश नोटा 1 डॉलर ते 20 डॉलरच्या होत्या. ट्रकमधून पैशांची बॅग पडल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पैसे रस्त्यावर पडल्यानंतर त्या मार्गाने जाणारा प्रत्येकजण पैसे घेण्यासाठी गाडीबाहेर पडला आणि पैसे गोळा करू लागला. डेमी बॅग्बी नावाच्या एका महिला बॉडीबिल्डरने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने स्वतः नोटा हातात धरल्या आहेत. ती म्हणते, "मी आतापर्यंत पाहिलेली ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे. प्रत्येकजण रस्त्यावरून पैसे घेण्यासाठी आपली कार थांबवत आहे."
अनेकांनी अधिकाऱ्यांना पैसे परत केले
या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी लोकांना पैसे परत करण्याचे आवाहन केले. सॅन डिएगो ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, त्यांनी या घटनेत किती पैसे गमावले हे सांगितले नाही. शुक्रवारी दुपारपर्यंत अनेक लोकांनी रस्त्यावरून उचललेली रोकड कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल (CHP) ला परत केली होती. घटनेनंतर दोन तासांनी महामार्ग खुला करण्यात आला.