गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीनं जगासमोर मोठं संकट उभं केले आहे. चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर हळूहळू ही महामारी जगभरात पसरली. आता लसीकरणामुळे बऱ्याच ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या(Coronavirus) नियंत्रणात येत असली तरी चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. याठिकाणी शांघाय शहरात प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमध्ये बँक आणि इन्वेस्टमेंट फर्मनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं आहे. त्याचसोबत या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच राहण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रात्री ऑफिसमध्येच झोपावं लागते. कोरोना लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांवर ऑफिसमध्येच राहण्याची वेळ आली आहे. चीनमधील प्रमुख शहर शांघाई येथे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र या शहरात १ हजाराहून अधिक आर्थिक संस्था कार्यरत आहेत. शांघाई शहरात चीनमधील सर्वात महत्त्वाचं स्टॉक मार्केटही आहे.(Lockdown in China)
सीएनएन रिपोर्टनुसार, एका व्यक्तीनं सांगितले आहे की, ट्रेडर्स अँन्ड फंड मॅनेजर यांना ६ हजार २३ हजारांपर्यंत प्रति रात्री ऑफिसमध्येच थांबण्यासाठी पैसे दिले जात आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या डेस्कजवळच फोल्डिंग बॅग लावले आहेत. काही फर्म कर्मचाऱ्यांना स्लिपिंग बेड, जेवणापासून अत्यावश्यक वस्तूही पुरवल्या जात आहेत. झोंग ओ एसेट मॅनेजमेंट एक चिनी फर्म आहे. त्यांच्याकडे ७४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून या कंपनीने कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच रात्री थांबवण्याची सूचना दिली आहे.
कोरोना संसर्ग वेगाने पसरू नये, यासाठी शांघाई शहरातील काही भागात सार्वजनिक वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. २६ मिलियन लोकसंख्या असलेल्या शहरातील अनेक सेक्टर हे बंद करण्यात आले आहेत. जागोजागी बूथ तयार करण्यात आले असून कोरोना चाचणी करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे शांघाईच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. तसेच कोरोनामुळे शांघाईचं डिजनी थीम पार्क आधीपासूनच बंद आहे. शांघाईसह चीनच्या उत्तर पूर्वेत असेलल्या जिलिन प्रांतातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की, 'कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलण्यात यावीत आणि आवश्यकता असेल त्या परिसरात ताबोडतोब लॉकडाऊन करावे.