जयपूर - राजस्थानमध्ये राहत असलेल्या एका ब्रिटिश नागरिकासोबत अत्यंत विचित्र असा प्रकार घडला आहे. कोरोनाच्या फैलावास सुरुवात होण्यापूर्वी राजस्थानमध्ये आलेल्या या व्यक्तीला सुरुवातीला डेंग्यू आणि नंतर मलेरियाने ग्रासले. हे कमी म्हणून की काय पुढे त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. या तिन्ही जीवघेण्या आजारांवर या व्यक्तीने मात केली. मात्र आजारपणांमधून सावरल्यानंतरही त्याच्यावरील संकटांची मालिका सुरू राहिली आणि त्याला एका विषारी सापाने दंश केला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या ब्रिटिश व्यक्तीने त्यावरही मात केली.इयान जोन्स असे या ब्रिटिश व्यक्तीचे नाव आहे. जोधपूर जिल्ह्यातील एका भागात त्यांना सर्पदंश झाल्यानंतर त्यांना जोधपूर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. याबाबत डॉक्टर अभिषेक तातर यांनी सांगितले की, इयान जोन्, यांना सर्पदंश झाल्यांनंतर रुग्णालयात आणण्यात आले होते. सुरुवातीच्या तपासामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असावेत (दुसऱ्यांदा) अशी शंका आली. मात्र रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यांचा चालण्यास त्रास होत होता. सर्पदंश झाल्याची सगळी लक्षणे दिसत होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्यावर कुठलाही दीर्घकालीन प्राभाव दिसून येणार नाही. पुढच्या काही दिवसांत ते पूर्णपणे बरे होतील.जोन्स यांना या आठवड्याच्या सुरुवातीस रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला. लवकरच ते मायदेशी परतणार आहेत. त्यांचा मुलगा सॅब जोन्, याने सांगितले की, माझे वडील एक फायटर आहेत. भारतात राहत असताना कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी त्यांना डेंग्यू आणि मलेरियासुद्धा झाला होता. कोरोनाच्या संकटामुळे ते ब्रिटनमध्ये परतू शकले नव्हते. इयान जोन्स हे राजस्थानमधील पारंपरिक कलाकारांसोबत काम करतात. ते त्यांचे सामान ब्रिटनमध्ये पाठवण्यासाठी मदत करतात.