अमेरिकेतील Oklahoma मध्ये एक अजब घटना घडली आहे. इथे एका कुत्र्याकडून चुकून त्याच्या मालकीनीवर गोळी झाडली गेली आहे. या घटनेमुळे पोलिसही हैराण झाले आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की, कुत्र्याने बंदूकीतून कशी गोळी झाडली असेल? तर झालं की, ४४ वर्षीय टीना स्प्रिंगर आणि ७९ वर्षाचे ब्रेंट पार्क कार घेऊन कुठे जात होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या ७ महिन्यांचा ल्रब्राडोर कुत्रा मोली सुद्धा होता. प्रवासादरम्यान त्याच्यामुळे चुकून बंदुकीतून गोळी सुटली आणि टीना जखमी झाली. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
Enidnews च्या रिपोर्टनुसार, टीना आणि ब्रेंट यांनी एक रेल्वे पास करण्यासाठी गाडी थांबवली होती. कारमध्ये मोली, टीना आणि ब्रेंटसोबतच .२२ कॅलिबरची एक लोडेड बंदुकही होती. ही बंदूक समोरच्या सीटजवळ सेंटर कंसोलमध्ये ठेवण्यात आली होती.
जेव्हा रेल्वे निघून गेली, तेव्हा मागच्या सीटवरील मोली बेधुंद होऊन कारच्या कंसोलजवळ उड्या मारू लागला. याचदरम्यान बंदुकीतून गोळी सुटली आणि टीनाच्या डाव्या मांडीवर लागली. ब्रेंटने लगेच पोलिसांना फोन करून मदत मागितली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, कुत्र्याकडून गोळी चालली. जी टीनाच्या मांडीवर लागली.
पोलिसांना सुरूवातीला ब्रेंटच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. पण घटनास्थळी पोहोचल्यावर समजावून सांगितल्यावर त्यांना पटलं आणि टीनाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलीस म्हणाले की, आम्ही ही अशाप्रकारची घटना पहिल्यांदाच पाहिली.