फॅनची मोटर आणि कार्डबोर्डच्या जुगाडाने बनवला होता पहिला टीव्ही, ९० वर्षांचा रोमांचक प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 12:45 PM2019-11-22T12:45:12+5:302019-11-22T12:52:44+5:30
कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती स्वतंत्रपणे लोकांसमोर सादर करण्यात टेलिव्हिजनची महत्वाची भूमिका आहे.
कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती स्वतंत्रपणे लोकांसमोर सादर करण्यात टेलिव्हिजनची महत्वाची भूमिका आहे. टेलिव्हिजनचं महत्व टिकवून ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने २१ नोव्हेंबर हा दिवस १९९६ मध्ये वर्ल्ड टेलिव्हिजन डे म्हणून घोषित केला होता. आजच्या जगात टेलिव्हिजनचं रूप फारच बदललं आहे. जुन्या काळातील टीव्ही आता भंगारात गेले आहेत. साधारण ९५ वर्ष जुन्या प्रवासात टीव्हीमध्ये कितीतरी बदल आला आहे. चला जाणून घेऊ जगातला पहिला टीव्ही तयार होण्याची रोमांचक प्रक्रिया...
टीव्हीचा आविष्कार होण्याआधी रेडिओचा जमाना होता. तो एक असा काळ होता, जेव्हा फार विरोधानंतर टीव्हीची सुरूवात झाली होती. १९२४ मध्ये पहिला टीव्ही तयार करण्यात आला होता. यासाठी मोठा बॉक्स, कार्ड आणि पंख्याच्या मोटरची मदत घेण्यात आली होती. स्कॉटलॅंडमध्ये जन्मलेल्या जॉन लोगी बेअर्डने टीव्हीचा आविष्कार केला होता.
(Image Credit : freepik.com)
टीव्ही कंट्रोल करण्यासाठी रिमोटचा वापर केला जातो. याचा आविष्कार यूजीन पोली याने केला होता. १९५० मध्ये रिमोटने कंट्रोल होणारा पहिला टीव्ही बाजारात आला होता. याचा रिमोट तारेच्या माध्यमातून टीव्ही सेटसोबत जोडलेला होता. वायरलेस रिमोट असलेल्या टीव्हींची सुरूवात १९५५ मध्ये झाली होती.
सुरूवातीच्या काळात टीव्ही फारच साधे असायचे. १९५४ मध्ये वेस्टिंगहाऊसने पहिला कलर टीव्ही तयार केला. सुरूवातील कलर टीव्हीचे केवळ ५०० सेटच तयार करण्यात आले होते. जास्त किंमत असल्याकारणाने काही काळासाठी कलर टीव्ही सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर होते. भारतात पहिला कलर टीव्ही कोलाकातामधील एका श्रीमंत परिवाराने खरेदी केला होता.
भारतात टीव्हीचा विकास दूरदर्शनच्या स्थापनेनंतर अधिक झाला. दूरदर्शनची स्थापना १५ सप्टेंबर १९५९ मध्ये झाली होती. आज टीव्हीवर कितीतरी चॅनल्स आहेत. पण सुरूवातील दूरदर्शनला मिळालेली लोकप्रियता आता मिळवणं अवघड आहे. दूरदर्शनचं नाव आधी 'टेलिव्हिजन इंडिया' असं होतं. नंतर ते दूरदर्शन असं करण्यात आलं.