झुरिच - पुर्वी भारतात सोन्याचा धूर वाहायचा असं आपले पूर्वज सांगतात. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की नाल्यातून खरंच सोनं वाहतं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. स्वित्झर्लंडमधील एका नाल्यात खरंच सोन्या-चांदीचे कण वाहतात.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एका संशोधनातून हे समोर आलंय की, तेथील नाल्यांमध्ये सोने आणि चांदी सापडले आहे. ज्याची किंमत जवळपास २० कोटींएवढी असु शकते. स्वित्झर्लंडमधील जलसंशोधकांनी गेल्यावर्षी एक संशोधन केलं होतं. त्याद्वारे त्यांना तेथील नाल्यांमध्ये तीन टन चांदी आणि ४३ किलो सोने सापडले होते. त्यावर त्यांनी अधिक अभ्यास केला. त्यातून असं सिध्द झालंय की, तेथील नाल्यांमधून हे सोनं-चांदी नेहमी सापडतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कोण टाकत असेल एवढं सोनं-चांदी?
अभ्यासकांनी याची उकल करून देताना सांगितलं की, ‘ज्या नाल्यांमधून हे सोनं सापडलं आहे त्या भागात अनेक कारखाने आहेत. त्यापैकी घड्याळाच्या कारखान्यांचं प्रमाण जास्त आहे.’ आता तुम्हाला माहित्येय की महागडी घड्याळं बनवण्यासाठी सोन्यांच्या बारीक कणांचा वापर केला जातो. त्याचे कण सांडपाण्याद्वारे गटारात मिसळले जातात. तसंच आजूबाजूला अनेक फार्मा आणि रासायनिक कारखानेही आहेत. त्यांच्या अनेक उत्पादनांमध्ये सोन्या-चांदीच्या वर्खाचा वापर केला जातो. त्यामुळे ते कण पाण्याच्या प्रवाहातून नाल्यांमध्ये येत असतात.
या नाल्यांच्या पाण्यात सोने असल्याचा अभ्यास प्रसिध्द झाल्यावर स्थानिकांनी तेथे सोनं-चांदी शोधण्याचा प्रयत्नही केला. मात्र नंतर शास्त्रज्ञांनी सांगितलं की, ‘ या पाण्यातील सोनं-चांदी लहान-लहान तुकड्यांच्या स्वरुपात आहे. त्यामुळे तुम्ही जरी ते शोधण्याचा प्रयत्न जरी केलात तरी सापडणार नाहीत.’
खरंतर स्वित्झर्लंडला फार श्रीमंत आणि उद्योन्मुख शहर म्हणून ओळखं जातं आणि या संशोधनानंतर, ते खरंच श्रीमंत आहेत, असं म्हणायला हरकत नाही.