हरयाणाच्या कालांवालीमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेने चुकीने खराब झालेल्या भाज्यांसोबत ४ तोळं सोनंही घराबाहेर फेकलं. त्यानंतर गल्लीत फिरत असलेल्या वळूने भाज्यांसोबतच सोन्याचे दागिनेही खाल्ले. आता घरातील सोनंच गायब झालं आहे म्हटल्यावर कुटूंबातील चांगलाच धक्का बसला. दागिन्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज चेक करण्यात आलं. आणि या फुटेजमधून दिसून आलं की, एका मोकाट वळूने भाज्यांसोबत सोन्याचे दागिनेही खाल्लेत.
मग काय संपूर्ण कुटूंब या मोकाट वळूचा शोध घेण्यासाठी पायपीट करू लागलं. मोठ्या शोध मोहिमेनंतर वळू सापडला आणि त्याला घरी आणलं गेलं. त्यांनी वळूला एका मोकळ्या जागेत बांधलं. आता या परिवाराकडून वळूला चांगलाच पाहुणचार केला जात आहे. वळूला हिरवा चारा, गूळ, केळी खायला दिल्या जात आहेत. जेणेकरून शेणाद्वारे सोनं बाहेर येईल. पण अजूनपर्यंत यात त्यांना यश मिळालं नाही.गेल्या शुक्रवारी या परिवारातील लोक एका कार्यक्रमातून घरी परतत होते. यादरम्यान घरातील महिला एका कटोऱ्यात दागिने काढून झोपली. सकाळी महिलेने फार काही लक्ष दिलं नाही आणि त्याच कटोऱ्यात खराब भाजी टाकली.
(Image Credit : Social Media)
त्यानंतर घरातील दुसऱ्या महिलेने ही भाजी जनावरांना खायला टाकतात त्या जागेवर फेकली. काही मिनिटांनी त्या जागेवर वयोवृद्ध महिलेला सोन्याचं एक कानातलं सापडलं. जेव्हा हे कानातलं घरात नेऊन दाखवलं तेव्हा लक्षात आलं की, सोन्याचे दागिने किचनमध्ये होते. किचनमध्ये जाऊन पाहिलं तर दागिने तिथे नव्हते.
मग लगेच परिवारातील लोकांनी सीसीटीव्ही फुटेज चेक आणि सगळा प्रकार समोर आला. त्यात त्यांना दिसलं की, भाज्यांसोबतच सोन्याचे दागिने एका वळूने खाल्लेत. नंतर तीन तास त्याचा शोध घेण्यात आला. आता सहा दिवस होऊन गेले आहेत, वळूचा चांगला पाहुणचार सुरू आहे. जेणेकरून ४ तोळं सोनं परत मिळेल.