एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 05:31 PM2024-05-15T17:31:02+5:302024-05-15T17:48:18+5:30
महिसागर जिल्ह्यातील खानपूर तालुक्यातील अमेठी गावात राहणारे 75 वर्षीय सायबा भाई डामोर यांचं लग्न 60 वर्षीय कंकू बेन परमार यांच्याशी झालं आहे.
गुजरातमधील महिसागर जिल्ह्यात एक अनोखी घटना समोर आली आहे. महिसागर जिल्ह्यातील खानपूर तालुक्यातील अमेठी गावात राहणारे 75 वर्षीय सायबा भाई डामोर यांचं लग्न 60 वर्षीय कंकू बेन परमार यांच्याशी झालं आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सायबा भाई डामोर यांचं लग्न हे त्यांच्याच मुलीने मोठ्या थाटामाटात विधीवत लावून दिलं आहे.
अमेठी गावात राहणारे 75 वर्षीय सायबा भाई डामोर यांचा विवाह गावात राहणाऱ्या साठ वर्षीय कंकू बेनसोबत झाला आहे. सायबा भाई डामोर यांच्या पहिल्या पत्नीचे 2020 मध्ये निधन झाले होते. त्याचवेळी साठ वर्षीय कंकू बेन यांच्या पतीचेही निधन झाले आहे.
सायबा भाई डामोर आणि कंकू बेन हे एकमेकांना आधीच ओळखत होते आणि त्यांचे हे दुसरे लग्न आहे. सायबा यांना एकच मुलगी होती, जिचं लग्न झालं होतं. अशा स्थितीत म्हातारपणी वडिलांची सेवा करायला कुटुंबात कोणीच नव्हतं. त्यामुळे सायबा भाईंच्या मुलीने आणि जावयाने स्वतः वडिलांचं दुसरं लग्न लावून दिलं.
सायबा भाई डामोर त्यांच्या दुसऱ्या लग्नात इतके आनंदी होते की ते डीजेच्या तालावर खूप नाचले. दोन वडिलधाऱ्यांच्या लग्नाला संपूर्ण गाव उपस्थित होतं. गावातील महिलांसह सर्व वयोगटातील लोक लग्नात नाचताना दिसले. 75 वर्षीय सायबा भाई डामोर आणि 60 वर्षीय कंकू बेन यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता जोरदार व्हायरल होत आहे.