तंत्रज्ञानाची किमया! माणसांचं आयुष्य वाढवण्यासाठी केला रिसर्च, मेंदूबाबत NGO चा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 06:34 PM2022-03-30T18:34:37+5:302022-03-30T18:39:03+5:30
Human Brain : मानवाचा मेंदू दीर्घ काळ जिवंत ठेवण्यासाठी सध्या संशोधन सुरू आहे.
नवी दिल्ली - विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे, की आता मानव अमर होण्यासाठी देखील विविध प्रकारचं संशोधन करण्यात येत आहे. अद्याप मानवी शरीराला अमरत्व (Eternity of Human Life) मिळालेलं नाही. परंतु मानवाचा मेंदू दीर्घ काळ जिवंत ठेवण्यासाठी सध्या संशोधन सुरू आहे. रशियन अब्जाधीश दिमित्री इत्स्कोव (Dmitry Itskov) हे एका एनजीओच्या माध्यमातून मेंदूबाबतच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत.
‘2045 Initiative’असं या एनजीओचं नाव आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे, की माणसाच्या मृत्यूनंतरही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याच्या शरीराचं एका अॅपच्या स्वरूपात डिजिटल बॉडीमध्ये रूपांतर केलं जाईल आणि मेटाव्हर्स टेक्नॉलॉजीच्या (Metaverse Technology) माध्यमातून मानवी मेंदू त्या शरीरात जाऊन वर्षानुवर्षं जिवंत राहील. या अनोख्या प्रकल्पासाठी मानवाला त्याचा मेंदू मेटाव्हर्सवर अपलोड करावा लागेल.
मॉस्कोचे रशियन अब्जाधीश दिमित्री इत्स्कोव यांनी 2045 पर्यंत त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, दिमित्री म्हणतात, की त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जायचं आहे की नाही, हे माणसं ठरवू शकतील. जेव्हा त्यांचं जैविक शरीर मरण्यास सुरुवात होईल तेव्हा या संकल्पनेद्वारे ते त्यांच्या मेंदूची डिजिटल प्रत तयार करू शकतील. ही डिजिटल प्रत सायबर स्पेसमध्ये जिवंत राहू शकेल. या प्रक्रियेला माइंड अपलोडिंग असं म्हटलं जाईल.
इत्स्कोव्ह प्रथमच मेंदू आणि संगणक जोडण्याच्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत असे नाही. यापूर्वीच टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची न्यूरालिंक नावाची कंपनीही यावर संशोधन करत आहे. यामध्ये संपूर्ण मेंदू सायबरमध्ये अपलोड केल्यानंतर बसून विचार करत असतानाच काम होत जाईल. सध्या इत्स्कोव्ह यांचं तंत्र मेटाव्हर्समध्ये मानवी मेंदू अमर करण्याचं आहे. स्वत:ला भविष्यवादी म्हणवणारे टॉम चीझराइट म्हणाले, की तंत्रज्ञानाच्या मदतीने जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हीआर रोबोट्समध्येदेखील मानवी चेतना उत्पन्न केली जाऊ शकेल, तो दिवस उजाडणंही आता अशक्य नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.