सिडनी: पती-पत्नी बाहेर फिरायला गेल्यावर अनेकदा आठवणी घेऊन परततात. मात्र ऑस्ट्रेलियात एका दाम्पत्याच्या बाबतीत याच्या अगदी उलट घडलं. पती-पत्नी बाहेर जेवायला गेले असताना बिल देण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. पतीनं पत्नीला निम्मं बिल देण्यास सांगितलं. मात्र तिनं नकार दिला. यानंतर पतीनं थेट पोलिसांनाच बोलावलं. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. सिडनीत एक दाम्पत्य सी फूड रेस्टॉरंटमध्ये गेलं होतं. त्यावेळी पत्नीनं चायनिज ऑर्डर केलं. यावर पती नाराज होता. त्याला चायनिज आवडत नसल्यानं जेवणाचं निम्मं बिल तू दे, असं त्यानं पत्नीला सांगितलं. मात्र तिनं स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. यामुळे पती संतापला आणि त्यानं थेट पोलिसांना फोन केला. यानंतर पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. घडलेला प्रकार पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. हॉटेलमध्ये पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांपैकी एकानं पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 000 हा पोलिसांचा फोन नंबर केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरायचा असतो, असं अधिकाऱ्यानं पतीला सांगितलं. हॉटेलच्या सीसीटीव्हीत पोलीस संतापलेल्या पतीला गाडीत बसवताना दिसत आहेत. यावेळी पतीनं पोलिसांशी वाद घातला. देशात लोकशाही आहे आणि हॉटेलमध्ये जेवून मी अपराध केलेला नाही, असं म्हणत पतीनं पोलिसांशी वाद घातला.
पत्नीसोबतच टीटीएमएम; निम्मं बिल देण्यास बायकोचा नकार; नवऱ्याची पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 3:25 PM