मी भांडी घासली, टॉयलेट साफ केले - जेन्सेन हुआंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 12:21 PM2024-03-24T12:21:34+5:302024-03-24T12:21:46+5:30
आयुष्याने मला प्रत्येक कामाचा सन्मान करणे शिकविले. त्याशिवाय यशापर्यंत पोहोचता येत नाही.
माझ्यासाठी कोणतेही काम हे लहान नाही; मी भांडीसुद्धा घासलेली आहेत आणि टॉयलेटसुद्धा साफ केलेले आहेत. जेवढे टॉयलेट तुम्ही लोकांनी मिळून साफ केले नसतील त्यापेक्षा जास्त मी एकट्याने साफ केलेले आहेत. आयुष्याने मला प्रत्येक कामाचा सन्मान करणे शिकविले. त्याशिवाय यशापर्यंत पोहोचता येत नाही.
आज वेगाने विकसित होत असलेल्या जगात जे लोक मोठे स्वप्न पाहण्याचे धाडस करतात आणि त्यावर कृती करतात तेच यशस्वी होतात व सकारात्मक बदल घडवून आणतात. म्हणून या जगाला फक्त बोलणाऱ्यांचीच नव्हे, तर स्वप्न पाहणाऱ्यांची आणि त्यावर कृती करणाऱ्यांची गरज आहे. स्वप्न पाहणारे चांगल्या भविष्याची कल्पना करतात आणि कृती करणारे कल्पना वास्तवात आणतात.
यश ही काही स्थिर उपलब्धी नाही. तर तो एक सततचा प्रवास आहे. त्यासाठी संघर्ष लागतो. माझ्याही प्रवासाची सुरुवात ही संघर्षातून झाली आहे. आजपर्यंतच्या प्रवासात मी प्रचंड अपयश आणि अपमानास्पद वागणूक अनुभवलेली आहे; पण, नम्रतेमुळेच मी पुढे आलो.
तुमची बुद्धिमत्ता, तुमची मालकी
कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक असे तंत्रज्ञान आहे की ज्याद्वारे तुम्ही आश्चर्यचकित किंवा भयभीत न होता त्याचे फायदे घेण्यासाठी सक्रिय व्हायला हवे. कारण, ही एका नव्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात आहे.
ही क्रांती ऊर्जा किंवा अन्नधान्य उत्पादनासंदर्भात नाही. तर बुद्धीचे उत्पादन करण्यासंदर्भातील आहे आणि प्रत्येक देशाने आपल्या बुद्धी उत्पादनाचे मालक झाले पाहिजे. तुमची बुद्धिमत्ता ही तुमची मालकी आहे.
‘लीडर तोच असतो, जो...’
लीडर किंवा नेतृत्व करणाऱ्यांची भरभराट ही त्याच्या वैयक्तिक विकासात कधीच नसू शकते तर चांगला लीडर तो असतो जो स्वतःच्या टीमला सक्षम बनवितो आणि त्यांना अधिकाधिक उन्नत करण्यासाठी त्यांच्या क्षमतांना संधी उपलब्ध करून देतो.
नवव्या वर्षी साेडला देश
वयाच्या नवव्या वर्षी आपला देश तैवान सोडून अमेरिकेत गेलेले, एकेकाळी वेटर म्हणून काम केलेले जेन्सेन हुआंग हे आज एआय तंत्रज्ञानाची निर्मिती करणारी चिप मेकिंग अमेरिकन कंपनी एनविडिया कॉर्प या कंपनीचे सीईओ आहेत.
कठीण परिश्रम व संघर्षातून त्यांनी मिळविलेले यश आज जगासमोर प्रेरणादायी आहे.