जपानी पेंटर योशितोमो नारा यांची एक पेंटिंग चांगलीच चर्चेत आली असून ही पेंटिंग त्यांनी २००० साली काढली होती. गेल्या ६ ऑक्टोबरला या पेंटिंगचा लिलाव हॉंगकॉंगच्या मॉडर्नस्टिक कन्व्हेंशन सेंटरमध्ये झाला. या लिलावात पेंटिंगला रेकॉर्ड ब्रेक किंमत मिळाली आहे. ही योशितोमो यांच्याद्वारे काढण्यात आलेली आतापर्यंतची सर्वात महागडी पेंटिंग ठरली आहे.
'नाइफ बिहाइंड बॅक' असं टायटल असलेल्या या पेंटिंगसाठी सहा लोकांनी बोली लावली होती. सर्वात आश्चर्यकारक बाब ही आहे की, लिलाव केवळ १० मिनिटातच संपला आणि पेंटिंग विकली गेली.
लिलाव करणाऱ्या संस्थेने आधी या पेंटिंगची जी किंमत ठरवली होती, त्या किंमतीपेक्षा पाच पटीने अधिक बोली या पेंटिंगवर लावण्यात आली. याआधीही योशितोमो नारा यांच्या अनेक पेंटिंग चर्चेत होत्या. १९९१ मध्ये 'मुलीच्या हाती सुरी' असलेली पेंटिंग तयार केली होती. ही पेंटिंग सॅन फ्रॅन्सिस्कोच्या म्यूझिअम ऑफ आर्टमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती.
योशितोमो नाराने १९९९ मध्ये 'स्लीपलेस नाइट' शीर्षकाची एका मुलीची पेंटिंग काढली होती. ही पेंटिंग ३१ कोटी रूपयांना विकली गेली होती. योशितोमो यांच्या पेंटिंग्स आशियातील पेंटिंग फॅनमध्ये चांगल्याच लोकप्रिय आहेत.