विमानाला पाण्याने सलामी दिली जाते, पण असं का केलं जातं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 04:26 PM2021-10-02T16:26:42+5:302021-10-02T16:28:53+5:30
Water salutes to Airplane : तर याला म्हणतात, 'वॉटर सल्यूट'. अनेकांना असं वाटत असेल की, विमान थंड करण्यासाठी असं केलं जातं. पण तो एक गैरसमज आहे.
विमानाबाबतच्या अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच सर्वसामान्य लोकांमध्ये बघायला मिळते. अशीच विमानाबाबतची खास बाब आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, विमानावर अग्नीशमन दलाच्या बंबाने पाणी सोडलं जातं. तुम्हाला प्रश्न पडेल की, असं का केलं जातं. तर याला म्हणतात, 'वॉटर सल्यूट'. अनेकांना असं वाटत असेल की, विमान थंड करण्यासाठी असं केलं जातं. पण तो एक गैरसमज आहे.
अनेकांना असं वाटतं की, वॉटर सल्यूट हा विमानाला थंड करण्याच्या उद्देशाने दिला जातो. पण मुळात विमान हे १२ हजार फूट उंचीवर उडतात. इतक्या उंचीवर वातावरण फार थंड असतं. त्यामुळे विमान थंड करण्यासाठी पाणी सोडलं जातं, यात काहीच तथ्य नाही. वॉटर सल्यूट करण्याचा उद्देश हा सन्मान करण्याचा असतो.
विमानांआधी सर्वात जास्त वापर हा जहाजांचा केला जात होता. समुद्र मार्गानेच जगभरात प्रवास केला जात होता. त्यावेळी असं चलन होतं की, जेव्हाही एखादं नवीन जहाज समुद्रात उतरत असेल तर त्याच्यावर पाण्याचा वर्षाव करून स्वागत केलं जायचं. ही प्रथा पुढे विमानांसाठीही केली जाऊ लागली.
विमानाला दोनदा वॉटर सल्यूट दिला जातो. एक म्हणजे जेव्हा एखादं विमान एखाद्या विमानतळावरून पहिल्यांदाच उड्डाण घेत असेल तेव्हा असं केलं जातं. तर दुसरं कारण म्हणजे जर विमानाच्या कॅप्टनच्या रिटायरमेंटवेळी विमानावर पाण्याचा वर्षाव केला जातो. म्हणजेच वॉटर सल्यूट दिला जातो.