नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून तिळगुळाने सर्वांचं तोंड गोड करतात. मोठ्या उत्साहात भारतात मकरसंक्रांत हा सण साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया मकरसंक्रांतीचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व.
शुभ मुहूर्त
मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त हा बुधवार 15 जानेवारी म्हणजेच आज सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी सुरू झाला असून संध्याकाळी 5 वाजून 46 मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार आहे.
पूजेचा विधी
मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. या सुगड्यांमध्ये धन-धान्य टाकले जाते आणि मनोभावे पूजा केली जाते यानंतर गृहिणी एकमेकांनी वाण देतात आणि एकमेकींचे अभिष्टचिंतन करतात. पुजेसाठी छोटे मडके किंवा सुगडे आणले जातात. (हे पण वाचा-Makar Sankranti Special : 'या' पारंपरिक पदार्थांसोबत मकरसंक्रांत करा गोड)
या सुगड्यांना दोऱ्याने बांधतात. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात. तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण देणे म्हणते. (हे पण वाचा-Makar Sankranti Special : या पारंपारिक पदार्थांशिवाय साजरीच होऊ शकणार नाही मकरसंक्रांत!)
मकरसंक्रांत साजरी करण्याचे महत्व
संक्रांत साजरी करण्यामागील भौगोलिक कारण म्हणजे, सूर्याचा उत्तरेकडील प्रवास. या दिवशी उत्तरायणाला सुरुवात होते. तसेच हिवाळा कमी होऊन थंडीही कमी होते. तसेच दिवस मोठा होऊन रात्री छोटी होत जाते. या दिवशी काळ्या कपड्यांना फार महत्त्व असतं. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. यामागील उद्दीष्ट म्हणजे, सामान्यपणे पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर किंवा मैदानामध्ये जातो. त्यामुळे कोवळ्या उन्हामध्ये जाता येते.