हुगळी - कुत्रा माणसाला चावला तर बातमी होऊ शकत नाही. पण माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होऊ शकते, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात असा प्रकार सहसा घडत नाही. मात्र पश्चिम बंगालमध्ये माणूस कुत्र्याला चावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगालमधील हुगळी जिल्ह्यात एका मद्यधुंद व्यक्तीने भटक्या कुत्र्याचा कान चावला. हा प्रकार पाहिल्यानंतर जमावाने त्या व्यक्तीला पकडून त्याची धुलाई केली व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शंभुनाथ धाली, असे कुत्र्याला चावणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, तो मद्यपी आहे. पेशाने बांधकाम मजूर असलेला शंभुनाथ हा उत्तरपाडा येथील रस्त्याच्या किनाऱ्यावर झोपायचा. तसेच रोज रात्री मद्यपान करून आल्यावर तो शेजाऱ्यांना त्रास देत असे. त्याच्या अशा वर्तनामुळे भटके कुत्रेही तो दिसल्यावर भुंकायला सुरुवात करत असत, दरम्यान, रविवारी रात्रीसुद्धा तो दारू पिऊन धिंगाणा घालू लागल्यावर कुत्र्यांनी त्याच्यावर भुंकण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या शंभुनाथ याने कुत्र्याला पकडून त्याचा कान चावला. त्याचे हे कृत्य पाहिल्यावर शेजारीपाजारी गोळा झाले. त्यांनी शंभुनाथ याला पकडून त्याची धुलाई केली. तसेच त्याला पोलिसांच्या हवाली केले.
म्हणून त्याने घेतला कुत्र्याच्या कानाचा चावा, पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 3:19 PM