(Image Credit : amarujala.com)
गेल्या ५० वर्षांपासून बंद असलेली तिजोरी उघडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता, पण यात कुणालाही यश आलं नव्हतं. मात्र आता ही गेल्या ५० वर्षांपासून बंद असलेली तिजोरी केवळ ३० सेकंदात उघडण्यात आली आहे. ही तिजोरी उघडण्याचा कारनामा कॅनडातील स्टीफन मिल्स नावाच्या व्यक्तीने केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मिल्सने चक्क पहिल्या प्रयत्नातच ही 'रहस्यमयी' तिजोरी उघडली.
स्टीफन मिल्स त्याच्या परिवारासोबत अल्बर्ता प्रांतातील वर्मिलियन हेरिटेज म्युझिअमला फिरण्यासाठी गेला होता. इथे प्रदर्शनात अनेक वस्तू ठेवल्या होत्या. तिथेच ही 'रहस्यमयी' तिजोरी ठेवण्यात आली होती. ही तिजोरी १९७० पासून बंद होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही तिजोरी आधी ब्रंसविकच्या एका हॉटेलमध्ये होती. शेवटचं या तिजोरीला १९०६ मध्ये उघडण्यात आलं होतं. पण नंतर या तिजोरीला १९७० मध्ये पुन्हा बंद करण्यात आलं होतं आणि १९९० मध्ये हॉटेलच्या मालकाने तिजोरी या म्युझिअमला दान दिली होती. म्युझिअमने तिजोरी उघण्याचा प्रयत्न अनेकदा केला होता. ही तिजोरी उघडण्यासाठी अनेक तज्ज्ञांना बोलवण्यात आलं होतं. पण कुणालाच यश आलं नाही. पण इतक्या वर्षांनंतर मिल्सने हा कारनामा करून दाखवला.
मिल्सने २०-४० आणि ६० नंबर वापरत तिजोरी उघडली. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, व्यवसायाने वेल्डर मिल्सने सांगितले की, तिजोरीला वेगवेगळ्या नंबर्सने लॉक केलं होतं. त्याने घडाळ्याच्या हॅंडलच्या दिशेने २० नंबर तीन वेळा फिरवला, नंतर ४० नंबर उलट्या दिशेने दोनदा फिरवला आणि शेवटी सरळ दिशेने ६० नंबर एकदा फिरवला. तिजोरी उघडली गेली.
ही तिजोरी रहस्यमयी मानली जात होती. पण या तिजोरीमध्ये कोणताही खजिना नाही तर १९७० च्या दशकातील रेस्टॉरंट ऑर्डरचं एक बुक, ज्यात मशरूम बर्गर आणि सिगारेटच्या पॅकेटची बिल्स होते. या वस्तूंचं आता काहीही मूल्य नाही.