मॅरेज अॅक्ट आणि संविधानातील कलमे, वकिलाची अनोखी लग्नपत्रिका व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:43 PM2021-11-26T12:43:19+5:302021-11-26T12:47:09+5:30
असामच्या गुवाहाटी येथील एका वकील जोडप्याने संविधान थीम असलेली लग्नपत्रिका छापली आहे.
प्रत्येकाला आपले लग्न खास आणि संस्मरणीय बनवायचे असते आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे अनोखे मार्गही अवलंबतात. विशेषतः लग्नपत्रिकेत काहीतरी वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. काहीजण कार्डवर एखादा अनोखा संदेश लिहीतात, तर काही लोक लग्नपत्रिका विविध गोष्टीने सजवतात. पण, सध्या सोशल मीडियावर एक अनोखी लग्नपत्रिका व्हायरल होत आहे.
असामच्या गुवाहाटी येथील एका वकिलाची लग्नपत्रिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नासाठी चक्क संविधान थीम असलेली लग्नपत्रिका छापली आहे. कार्डमध्ये समानता दर्शवण्यासाठी वधू आणि वरांची नावे न्यायाच्या तराजूच्या दोन्ही बाजूला लिहिली आहेत. याशिवाय, लग्नाच्या आमंत्रणात भारतीय संविधानातील कायदे आणि अधिकारांचा उल्लेख आहे.
कार्डवर लिहिले आहे की, "विवाहाचा अधिकार हा भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार जगण्याच्या अधिकाराचा एक घटक आहे. त्यामुळे माझ्यासाठी रविवार, 28 नोव्हेंबर 2021 रोजी या मूलभूत अधिकाराचा वापर करण्याची वेळ आली आहे. जेव्हा वकील लग्न करतात तेव्हा ते 'हो' म्हणत नाहीत, ते म्हणतात- 'आम्हाला अटी व शर्ती मान्य आहेत'."
ही संविधानावर आधारित लग्नपत्रिका सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. काहींनी आमंत्रण वाचून CLAT अभ्यासक्रमाचा अर्धा भाग पूर्ण केल्याचे गमतीने सांगितले, तर काहींना वाटले की या जोडप्याचे लग्न न्यायालयीन थीमवर असेल. एका यूजरने म्हटले की, 'हे न्यायालयाच्या समन्ससारखे आहे. दुसरा म्हणाला, तो माणूस अजूनही त्याच्या नावावर वकील लावायला विसरला आहे. तिसऱ्या एका यूजरने लिहीले की, लग्नात पंडितांच्या जागी न्यायाधीश बसवा.