444 कोटी वर्षांपूर्वी उत्पत्ती अन् मौल्यवान धातूंचा साठा; आजही 'चंद्र' सर्वांसाठी आहे मोठे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 05:27 PM2023-08-23T17:27:19+5:302023-08-23T17:27:43+5:30
चंद्राचा जन्म कधी आणि कसा झाला, त्यावर कोणते धातू आहेत, अशा अनेक प्रश्नांचा शास्त्रज्ञ आजही शोध घेत आहेत.
Chandrayaan-3: भारताची चंद्रयान मोहीम असो, रशियाची लुना मोहीम असो किंवा अमेरिकेची आर्टेमिस मोहीम असो, प्रत्येक मोहिमेचे लक्ष चंद्राविषयी नवीन माहिती गोळा करणे आहे. दरम्यान चंद्राच्या अस्तित्वाशी संबंधित प्रश्न सर्वांना पडतो. चंद्राचा जन्म कधी आणि कसा झाला? हे एक मोठे वैज्ञानिक कोडे आहे. या प्रश्नाचे कोणतेही ठोस उत्तर अद्याप सापडलेले नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञ सतत संशोधन करत आहेत.
अमेरिकेच्या अपोलो मिशनच्या संशोधनानंतर चंद्राविषयीचा सर्वात ठोस सिद्धांत समोर आला. अपोलो मिशनने चंद्राच्या पृष्ठभागावरून खडकांचे तुकडे आपल्यासोबत आणले. या तुकड्यांवरील संशोधनाच्या आधारे शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की चंद्र 444 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आला होता. 444 कोटी वर्षांपूर्वी मंगळाच्या आकाराचा एक प्रोटोप्लॅनेट पृथ्वीवर आदळला, शास्त्रज्ञ या घटनेला जायंट इम्पॅक्ट म्हणतात. यातूनच चंद्राची निर्मिती झाल्याचा अंदाज आहे.
मौल्यवान धातूंचा खजिना
या धडकेमुळे पृथ्वीचा मोठा भाग तुटला आणि प्रचंड उष्णता निर्माण झाली. या उष्णतेत खडक वितळले आणि गरम वायू बाहेर आला. 20 कोटी वर्षे, गरम वायू आणि लावा चंद्राच्या दऱ्यांमध्ये वाहत राहिला. लाखो वर्षांनंतर हे खडक थंड होऊन पृथ्वीभोवती फिरू लागले. खडकांच्या याच गोलाला आज चंद्र म्हणतात.
कॅनडाच्या डलहौसी युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जेम्स ब्रेनन यांच्या म्हणण्यानुसार, चंद्रावर असलेल्या ज्वालामुखीच्या दगडांमध्ये आढळणारे सल्फर चंद्राच्या आत लपलेल्या लोह सल्फेटशी संबंधित आहे. या आधारावर चंद्रामध्ये प्लॅटिनम आणि पॅलेडियम सारख्या मौल्यवान धातूंचा साठा असल्याचा दावा केला जातो. नासाच्या अपोलो 17 मोहिमेच्या संशोधनानुसार चंद्रावर अत्यंत कमी प्रमाणात हेलियम, निऑन, अमोनिया, मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड वायू सापडले आहेत.