शास्त्रज्ञांनी तयार केला सर्वात पांढरा रंग; घराला करेल इतके थंड की, AC ची गरज भासणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 07:13 PM2021-09-19T19:13:37+5:302021-09-19T19:13:49+5:30
या रंगाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
अमेरिकेतील इंडियाना येथील पुर्झू विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत जगातील सर्वात पांढरा शुभ्र रंग तयार करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, या पांढऱ्या रंगाच्या मदतीने घर अतिशय थंड पडेल आणि घरात एसी बसवण्याचीही गरज भासणार नाही. या पांढऱ्या रंगाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात पांढरा रंग म्हणून स्थान मिळवलं आहे.
का बनवला हा रंग ?
तुम्हाला प्रश्न पडला असेल की, की शास्त्रज्ञांनी इतका पांढरा रंग का बनवला ? मुळात त्यांचा हेतू कोणताही जागतिक विक्रम मोडणं नाही, तर जागतिक तापमानवाढ थांबवणे हा आहे. विद्यापीठातील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक शिउलीन रुआन म्हणाले की, आम्ही सात वर्षांपूर्वी हा प्रकल्प सुरू केला होता. आमच्या मनात विजेची बचत आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासारख्या गोष्टी होत्या. मग आम्हाला सुर्याचा प्रकाश परावर्तित करणारा पांढरा रंग तयार करण्याचा विचार आला. त्यानंतर आम्ही हा रंग बनवण्याचे काम सुरू केलं.
काय आहेत वैशिष्ट्य ?
रुआन यांनी पुढं सांगितलं की, हा पांढरा रंग सुर्याच्या अतिनिल किरनांना वेगाने परावर्तित करतो. हा रंग 98.1% सोलर रेडिएशन थांबवतो आणि इन्फ्रारेड हीट उत्सर्जित करतो. हा कलर सुर्याची गरम किरने परावर्तित करत असल्यामुळे घरातील तापमान कमी होतं आणि गरमीपासून रक्षण केला जात. या कलरमुळे घरात एसीदखील लावण्याची गरज भासणार नाही, असंही ते म्हणाले.
AC पेक्षा पावरफुल
रुआन सांगतात की, एक हजार चौरस फूट घताला हा कलर मारल्यास 10 किलोवॅट कूलिंग पॉवर तयार होते. म्हणजेच, हा कलर घरात बसवलेल्या एअर कंडिशनरपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. हा अल्ट्रा व्हाईट पेंट बाजारात आणण्यासाठी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एका कंपनीशी चर्चाही केली आहे. त्यामुळे लवकरच हा पांढरा रंग सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होऊ शकतो.