आईच्या हातून नकळत चूक घडली; एका क्षणातच मुलाला ३००० कोटींना मुकावं लागलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 08:15 AM2021-12-20T08:15:49+5:302021-12-20T08:16:19+5:30
मागील काही वर्षांपासून क्रिप्टोकरेंसीच्या मार्केटबाबत ऐकलं असता त्याला आपणही कॉलेजमध्ये असताना बिटकॉईन खरेदी केल्याची मुलाला आठवण आली.
एका मुलाच्या आईने स्वत:च्या मुलालाच इतकं मोठं नुकसान दिलं की ज्यामुळे तो मुलगा मानसिक तणावाखाली गेला. आईनं नकळत केलेल्या चुकीमुळे मुलाला तब्बल ३ हजार कोटींपासून वंचित राहावं लागलं. सोशल मीडियाच्या रेडिट या साइटवर या व्यक्तीनं स्व:तची ओळख लपवून त्याच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेबाबत खुलासा केला आहे.
आईच्या चुकीमुळं ३००० कोटी बुडाले
या मुलाने सांगितले की, त्याच्या आईच्या एका छोट्या चुकीमुळे त्याचं ३ हजार कोटींचे नुकसान झाले. या घटनेने त्याचे आयुष्य बर्बाद झाले. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, या मुलाने २०१० मध्ये ६ हजार रुपयांमध्ये १० हजार बिटकॉईन खरेदी केले होते. त्यावेळी मुलगा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला नोकरी लागली. नोकरीच्या कालावधीत तो इतका व्यस्त झाला की त्याला क्रिप्टोकरेंसी खरेदी केलीय का? याचीही आठवण नव्हती.
त्यानंतर मागील काही वर्षांपासून क्रिप्टोकरेंसीच्या मार्केटबाबत ऐकलं असता त्याला आपणही कॉलेजमध्ये असताना बिटकॉईन खरेदी केल्याची आठवण आली. त्यानंतर त्याने घरी जाऊन तो लॅपटॉप शोधू लागला ज्यात त्याने १० हजार बिटकॉईन खरेदी केल्याचे डिटेल्स जपून ठेवले होते. त्याने संपूर्ण घरात लॅपटॉप शोधला परंतु तो त्याला सापडलाच नाही. त्यानंतर मुलाने आईला लॅपटॉपबद्दल विचारणा केली.
आईनं भंगारात फेकला लॅपटॉप
आईनं जेव्हा लॅपटॉपबाबत सांगितले ते ऐकून मुलाचे भान उडाले. मुलाच्या आईनं लॅपटॉप भंगारात दिला होता. भंगारात देताना आईनं मुलाला विचारलंही नव्हतं. मात्र या प्रकारामुळे मुलाच्या आयुष्य उद्ध्वस्त झालं. कारण आजच्या हिशोबाने १० हजार बिटकॉईनची किंमत ३०० मिलियन पाउंड म्हणजे ३ हजार कोटी इतकी झाली होती. आईनं केलेल्या नकळत चुकीमुळे मुलाला ३ हजार कोटींना मुकावं लागलं.
या प्रकारानंतर मुलगा मानसिक तणावाखाली गेला होता. आता तो हळूहळू त्यातून सावरु लागला आहे. परंतु इतकी मोठी रक्कम हातातून निसटल्याची खंत आजही त्याच्या मनात कायम आहे. बिटकॉईन एक व्हर्चुअल करेंसी आहे. २००९ मध्ये बिटकॉईनची सुरुवात झाली होती. बिटकॉईनच्या एका क्रिप्टोकरेंसीची किंमत आजच्या घडीला लाखो रुपयांमध्ये आहे.