अंतराळ वीर हे सामान्यपणे फार गंभीर किंवा शांत असतात. खरंतर त्यांच्यासाठी गंभीर असणं गरजेचंही आहे. जेणेकरून ते त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष देऊ शकतील. पण NASA ची टीम काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात आहे. अंतराळ वीरांचा एक टीम २०३० मध्ये मंगळ ग्रहावर जाणार आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, नासाला या टीममध्ये 'जोकर' ची भरती करायची आहे.
हे आहे कारण?
मीडिया रिपोर्टनुसार, नासाचं मिशन मार्स साधारण २ वर्षांसाठी असेल. या मिशनसाठी अशा लोकांचा शोध सुरू आहे जे टीमचा आत्मविश्वास कायम ठेवू शकेल. त्यांना टेन्शन येऊ नये म्हणून गमती जमती करेल. या जोकरचं नेमकं काय काम असेल यावर नासा मिशन ग्रुपकडून विचार सुरू आहे.
कठीण काळात फायदेशीर ठरतील हे लोक
यूनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडामध्ये एंथ्रोपॉलॉजीचे प्राध्यापक जेफरी जॉनसन यांनी सांगितले की, 'हे लोक कठीण आणि अडचणीच्या काळात पूर्ण टीमला एकत्र ठेवू शकतात. आम्ही अशा व्यक्तीचा शोध घेत आहोत, जो त्याचं काम चांगलं करेल आणि लोकांना हसवत ठेवेल. कारण इतक्या जास्त काळाचं मिशन असल्याने टीममधील लोकांना तणाव येणे सामान्य बाब आहे'.
केवळ हसवणेच नाही तर...
प्राध्यापक जेफरी म्हणाले की, त्या व्यक्तीला केवळ हसवण्याची कला अवगत असावी असे नाही. हा व्यक्ती एक चांगला वैज्ञानिक आणि इंजिनिअर असायला हवा. त्याला एका ट्रेनिंग प्रोसेसमधूनही जायचं असेल.
याआधीही अशा अनुभव
प्राध्यापकांनी साऊथ पोलपर्यंत पोहोचणाऱ्या रोआल्ड एमंडसनचा उल्लेख करत सांगितले की, 'कॅप्टन स्कॉट ज्या कामात अयशस्वी झाले होते, ते काम रोआल्डने यशस्वीपणे केलं. असं झालं कारण त्यांच्या टीममध्ये एक आचारी होता. त्याचं नाव होतं अडॉल्फ लिंडस्ट्रॉम. तो फारच गमती स्वभावाचा होता. तो स्वत:ही आनंदी रहायचा आणि दुसऱ्यांनाही हसवायचा. याने टीमचा आत्मविश्वास नेहमी कायम राहत होता'.