दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळीला रोषणाई करून, लक्ष्मीची पूजा केली जाते. याच दिवशी दिवे पेटवून भगवान राम अयोध्येत परतल्याचा आनंद साजरा केला जातो. देशभरात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, जगातलं एक असंही ठिकाण आहे जिथे लोक वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करतात.
आपला शेजारी देश नेपाळमध्येही दिवाळी खासप्रकारे साजरी केली जाते. पण इथे दिवाळीला लक्ष्मी किंवा गणेशाची नाही तर कुत्र्यांची पूज करण्याची प्रथा आहे. नेपाळमध्ये दिवाळीला तिहार म्हटलं जातं. जशी भारतात दिवाळी साजरी होते. तसाच नेपाळमध्ये तिहार. या दिवशी लोक तिथे दिवे लावतात, नवीन कपडे घेतात, जल्लोष करतात. दुसऱ्याच दिवशी आणखी एक दिवाळी साजरी केली जाते. या दिवाळीला कुकुर तिहार म्हटलं जातं. कुकुर तिहारला कुत्र्यांची पूजा केली जाते.
खास बाब ही आहे की, ही दिवाळी इथेच संपत नाही तर पाच दिवस चालते. यादरम्यान गाय, कुत्रे, कावळे आणि बैलांची पूजा केली जाते. कुकुर तिहारला कुत्र्यांचा सन्मान केला जातो. त्यांची पूजा केली जाते, त्यांना फुलांचे हार घातले जातात आणि टिळेही लावले जातात.त्यासोबतच कुत्र्यांसाठी खास पदार्थही तयार केले जातात. त्यांना दही खायला दिलं जातं. अंडी आणि दूधही दिलं जातं. हे करण्यामागे अशी मान्यता आहे की, लोकांना वाटतं कुत्र्यांनी नेहमीच त्यांच्यासोबत रहावे.
कुकुर तिहारमध्ये विश्वास ठेवणारे लोक कुत्र्यांना यम देवतेचा संदेशवाहक मानतात. नेपाळमधील लोकांची अशी मान्यता आहे की, कुत्रे मृत्यूनंतरही मालकाची रक्षा करतात. याच कारणाने नेपाळमध्ये कुत्र्यांची पूजा केली जाते.