अरे व्वा! "मूड नसेल तर ऑफिसला येऊ नका", 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय Unhappy leave
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 03:53 PM2024-04-12T15:53:10+5:302024-04-12T16:02:29+5:30
कंपनीने कर्मचाऱ्यांना चांगलं वर्क लाईफ देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी Unhappy leave ची सुरुवात केली आहे.
नोकरी करणाऱ्यांना अनेकदा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कितीही समस्या येत असल्या तरी तुम्हाला ऑफिसमध्ये पोहोचून फोकस करून काम करावं लागतं. म्हणजेच कोणतीही कौटुंबिक समस्या असो, कुणाशी भांडण असो किंवा निराश असाल, त्याचा तुमच्या ऑफिसच्या कामावर परिणाम होऊ नये, हे कंपनीला तुमच्याकडून अपेक्षित असतं. याच दरम्यान चीनच्या एका कंपनीच्या मालकाचं विधान अतिशय खास आणि वेगळं आहे.
चीनमधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना चांगलं वर्क लाईफ देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी Unhappy leave ची सुरुवात केली आहे. मार्चच्या शेवटी 2024 च्या चायना सुपरमार्केट वीकदरम्यान मध्य चीनच्या हेनान प्रांतातील रिटेल चेन, पेंग डोंग लाईचे संस्थापक आणि अध्यक्ष यू डोंगलाई यांनी ही मोठी घोषणा केली. कर्मचाऱ्यांचा मूड ठीक नसल्यास ते दहा दिवसांची सुट्टी घेण्यासाठी पात्र असतील असं म्हटलं आहे.
प्रत्येक स्टाफ मेंबरला स्वातंत्र्य मिळावं अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी असते जेव्हा तो आनंदी नसतो. त्यामुळे जर तुम्ही खूश नसाल तर कामावर येऊ नका. कर्मचाऱ्यांना त्यांचा आरामाचा वेळ ठरवण्याचं स्वातंत्र्य हवं. त्यांना पुरेसा आराम मिळायला हवा. मॅनेजमेंटकडून ही सुट्टी नाकारली जाणार नाही असं यू डोंगलाई यांनी म्हटलं आहे.
Unhappy leave या कल्पनेला सोशल मीडियावर खूप सपोर्ट मिळत आहे. Weibo वर एका व्यक्तीने सांगितलं की, एवढा चांगला बॉस आणि या कंपनीच्या संस्कृतीचा देशभर प्रचार व्हायला हवा. मला या कंपनीत काम करायचं आहे. मला वाटतं की मला तेथे आनंद आणि आदर मिळेल असं दुसऱ्याने म्हटलं आहे. चीनमधील कामाच्या ठिकाण असलेल्या चिंतेबाबत 2021 च्या सर्वेक्षणानुसार, 65 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर थकलेले आणि दु:खी असतात. Unhappy leave ची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा रंगली आहे.