नरेंद्र मोदींविरोधात फेसबुकवर कमेंट करणा-या आयएएस अधिका-याला नोटीस
By admin | Published: June 1, 2016 11:04 AM2016-06-01T11:04:45+5:302016-06-01T11:04:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात फेसबुकवर कमेंट करणा-या मध्यप्रदेशातील वरिष्ठ आयएएस अधिका-याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
भोपाळ, दि. 01 - पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात फेसबुकवर कमेंट करणा-या मध्यप्रदेशातील वरिष्ठ आयएएस अधिका-याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राज्य सरकारने अजय सिंग गंगवार यांना ई-मेलद्वारे ही नोटीस पाठवली आहे. महत्वाचं म्हणजे याअगोदर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं कौतुक केल्याने त्यांची बदली करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात करण्यात आलेल्या फेसबुकवरील पोस्टला अजय सिंग गंगवार यांनी लाईक करत कमेंटही केली होती. 23 जानेवारी 2016 मध्ये करण्यात आलेल्या या पोस्टवर अजय सिंग गंगवार यांनी 'मोदींच्या विरोधात जनक्रांती झाली पाहिजे' अशी कमेंट केली होती. अजय सिंग गंगवार यांनी मात्र आपण अशा प्रकारच्या कोणत्याच पोस्टवर कमेंट केली नसल्याचं म्हटलं आहे.
उपसचिव म्हणून बदली करण्यात आलेले अजय सिंग गंगवार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन मोदींविरोधातील पोस्टला लाईक किंवा कमेंट केली नसल्याचं सांगत सर्व आरोप फेटाळले आहेत. 'जर मी 23 जानेवारीला काही पोस्ट केलं होतं किंवा लाईक केलं होतं, तर मग मला नोटीस पाठवण्यासाठी इतका वेळ का घेतला ? मला एका आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. माझ्या उत्तरात फेसबुक अकाऊंटवर कोणतीही पोस्ट किंवा लाईक नसल्याची माहिती देणार असल्याचं', अजय सिंग गंगवार यांनी सांगितलं आहे.
अजय सिंग गंगवार यांनी फेसबुकवर जवाहरलाल नेहरुंचं कौतुक केल्याबद्दल बरवानीच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांना हटवण्यात आलं होतं, आणि बदली करण्यात आली होती. 'नेहरुंनी कोणत्या चुका करायला नको होत्या याची मला माहिती सांगा, 1947मध्ये हिंदू तालिबानी राष्ट्र बनण्यापासून त्यांनी आपल्याला रोखलं ही त्यांची चूक आहे का ?' अशी पोस्ट अजय सिंग गंगवार यांनी टाकली होती. ज्यानंतर माझी बदली करण्यात आल्याचा आरोप अजय सिंग गंगवार यांनी केला होता.