इस्लामाबाद : हे वाचून तुमच्या अंगावर नक्कीच शहारे येतील. ही घटना आहे पाकिस्तानातील. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या एका पायलटने ट्रेनीकडे विमान सोपवून चक्क झोप घेतली. ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातील. पाकिस्तानातील विमानतळावरून या विमानाने लंडनला जाण्यासाठी उड्डाण केले. वरिष्ठ पायलट आमीर अख्तर हाश्मी यांनी ट्रेनी पायलटकडे विमान सोपविले आणि ते झोपी गेले. थोडीथोडकी नव्हे, तर पायलटने चक्क अडीच तास झोप घेतली. या विमानात ३०५ पेक्षा अधिक प्रवासी होते. हवाई वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी या पायलटवर कारवाई करण्यात आली आहे. पायलटला सेवेतून निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाची चौकशीही करण्यात येत आहे. आमीर अख्तर हाश्मी हे पाकिस्तान एअरलाइन्स पायलट असोसिएशनचे अध्यक्षही राहिलेले आहेत. एक बेधडक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे; पण विमानात झोपी जाण्याच्या त्यांच्या कृतीने अनेक प्रवाशांची झोप मात्र उडाली आहे.
ट्रेनीकडे विमान सोपवून पायलट झोपी गेला
By admin | Published: May 08, 2017 1:24 AM