पोलीस कॉन्स्टेबलने घेतली तब्बल 16 वर्ष सुट्टी, विभागाने दाखविला घरचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 01:12 PM2017-11-04T13:12:31+5:302017-11-04T13:13:25+5:30
उत्तर प्रदेशमधील पीलीभीत जिल्ह्यातल्या कोतवाली पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल बलविंदर सिंग कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय सुट्टीवर गेला.
पीलीभीत- उत्तर प्रदेशमधील पीलीभीत जिल्ह्यातल्या कोतवाली पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल बलविंदर सिंग कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय सुट्टीवर गेला. 13 नोव्हेंबर 2001 रोजी हा पोलीस कॉन्स्टेबल सुट्टीवर गेला. त्यानंतर या कॉन्स्टेबलने तब्बल 16 वर्ष कामावर हजेरीच लावली नाही.
नोकरीतून रजा घेतली तेव्हा तरुण असणारा बलविंदर परतला तेव्हा त्याने चाळीशी गाठली होती. आपल्या रजेचं कोणतंही ठोस कारण देता न आल्यानं त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. पण त्यापूर्वी या पोलीस ठाण्याचे माजी पोलीस अधीक्षक रंजन वर्मा यांना बलविंदर प्रकरणाची काहीच माहिती नसल्याने त्यांनी जून महिन्यात पोलीस ठाण्यात आलेल्या बलविंदरला नोकरीत रुजू करून घेतलं होतं.4 महिन्यांनंतर वर्तमान पोलीस अधीक्षक कलानिधी नैथानी यांना सुट्ट्यांची चौकशी करताना बलविंदरच्या 16 वर्षाच्या सुट्टीबद्दल समजलं. बलविंदरने कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय सुट्टी घेतल्याबद्दल कुठलंही ठोस कारण, आरोग्य प्रमाणपत्रं दिलं नाही.
'बलविंदरला आपले वडील धरम सिंग यांच्या जागेवर नोकरी मिळाली होती. तो इतकी वर्षं कोणतं बेकायदा काम करत होता का याची मी पंजाब इंटेलिजन्सला चौकशी करायला सांगितली आहे, असं पोलीस अधीक्षक नैथानी म्हणाल्या. तसंच इतकी वर्ष रजेवर असलेल्या बलविंदरला पगार दिला गेलेला नाही हेही नैथानी यांनी स्पष्ट केलं.