प्रत्येकालाच आपली साइन(हस्ताक्षर) वेगळी आणि आकर्षक हवी असते. अशी एक धारणा आहे की, व्यक्तीच्या सिग्नेचरवरून त्याचं व्यक्तिमत्व सुद्धा कळतं. त्यामुळे साइन चांगली व्हावी यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करतात. असंच काहीसं रशियातील क्रायनोयार्क्समध्ये राहणाऱ्या २० वर्षीय इवान कुजिन या विद्यार्थ्याचं होतं. त्याला पासपोर्ट काढण्यापूर्वी त्याची साइन बदलायची होती. मदतीसाठी तो अनास्तासिया या मित्राकडे गेला.
अनास्तासिया हा चीनमधून कॅलिग्राफी शिकला आहे. त्याने कुजिनसाठी एक सिग्नेचर डिझाइन तयार केलं. सोबत ही साइन कशी करायची हे सुद्धा शिकवलं. कुजिनला सुंदर साइन मिळण्यासोबतच एक जबरदस्त बिझनेस आयडिया सुद्धा सापडली. दोघांनी मिळून सिग्नेचर डिझाइनचा ऑनलाइन बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला.
कुजिन याने आधीच एक कंपनी रजिस्टर करून ठेवली होती. त्यानंतर त्याने नवा बिझनेस सुरू करण्यासाठी राइट टाइट नावाचं इन्स्टाग्राम हॅंडलही सुरू केलं आणि १५ हजार रूबल(१६ हजार रूपये) ऑनलाइन मार्केटिंगवर खर्च केले. १२ तासांच्या आत त्यांना पहिलं काम मिळालं. जेव्हा ग्राहकांची संख्या ४० पार झाली तेव्हा दोघांनी आणखी एका कॅलिग्राफी आर्टिस्टला नोकरीवर ठेवलं. २०१८ च्या डिसेंबरमध्ये राइट टाइटची सुरूवात झाली होती. या २०१९ च्या एप्रिलपर्यंत या कंपनीचं उत्पन्न ३०, ५०० डॉलर(२२ लाख रूपये) पर्यंत पोहोचलं होतं.
ग्राहकांना सिग्नेचर बनवून देण्याचं काम
ग्राहक जेव्हा राइट टाइटशी संपर्क करतात तेव्हा सर्वातआधी कंपनीकडून ग्राहकांचं संपूर्ण प्रोफाइल चेक केलं जातं. ग्राहकांच्या शिक्षणावरून आणि त्यांच्या बिझनेसवरून त्यांना १० सिग्नेचर तयार करून दिल्या जातात. जर हे १० सॅम्पल रिजेक्ट झाले तर आणखी १० पर्याय दिले जातात. जेव्हा ग्राहक सिग्नेचर निवडतात तेव्हा कंपनी एक एज्युकेशन मटेरिअल तयार करते. ग्राहकांना ही सिग्नेचर कशी करायची हे शिकवलं जातं. बेसिक सिग्नेचर डिझाइनसाठी कंपनी आता ग्राहकाकडून ५ हजार रूबल (५, ३०० रूपये) फी घेते.
असं वाढणार कंपनीचं उत्पन्न
राइट टाइट कंपनीसाठी आता ८ कर्मचारी काम करत आहेत. कुजिन हा कंपनीची स्ट्रॅटेजी, कर्मचाऱ्यांना घेणे आणि मॅनेजमेंटचं काम बघतो. तर अनास्तासिया हा आर्टचं काम बघतो. कुजिननुसार, आतापर्यंत जेवढे ग्राहक मिळाले, त्यातील जास्तीत जास्त हे मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गसारख्या शहरातील होते. काही ग्राहक जर्मनी, ब्रिटन, इस्त्राइल आणि अमेरिकेतीलही होते. त्याने सांगितले की, कंपनी आता कॅलिग्राफी आणि हॅंडरायटिंगशी संबंधित कोर्टही सुरू करणार आहे.