निडा : आपण काही महत्वाचं काम करत असताना एखादी माशी येऊन ते काम बिघडवते असा अनुभव तुम्हालाही कधी ना कधी आला असेल. असंच एका माशीने २२ लोकांची एका आठवड्याची मेहनत एका सेकंदात धुळीस मिळवली आहे. जर्मनीच्या निडा शहरात हा किस्सा घडला आहे.
जर्मनीच्या निडा शहरात २२ लोकांची एक टीम ५९६, २२९ मिनी डोमिनोज एकत्र पाडून नवीन रेकॉर्ड करणार होते. इतक्यात एका माशीने एक डोमिनो पाडून त्यांचं स्वप्न धुळीस मिळवलं. कारण एक डोमिनो पडताच सर्व डोमिनो लागोपाठ पडू लागले. हे डोमिनो पुन्हा उभे करण्यासाठी टीमला एक आठवड्याचा वेळ लागणार होता. तर ते तयार करण्यासाठीही तितकाच वेळ लागणार होता.
जर्मनीच्या सिनर्स डोमिनो एन्टरटेन्मेंट द्वारे आयोजित या कार्यक्रमात वापरले गेलेले डोमिनो बोटाच्या नखा इतक्या आकाराचे होते. हे डोमिनो इतरवेळी वापरल्या जाणाऱ्या डोमिनोजपेक्षा १०० पटीने हलके आणि लहान होते, त्यामुळे माशी ते पाडू शकली.
या टीमने २०१३ मध्ये डोमिनोज पाडण्याचा रेकॉर्ड गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला होता. हा आपलाच रेकॉर्ड तोडण्यासाठी त्यांनी यावेळी फार मेहनत केली होती. ज्यावर एका माशीने पाणी फेरले.