आपल्या देशात आमदार आणि खासदार यांचा काय दबदबा असतो किंवा ते काय काय करतात हे सर्वांनाच माहीत असतं. काही समस्या किंवा गंभीर आरोप झाले तरी सुद्धा खासदार काही राजीनामा देत नाहीत. संसदेत कोणत्या मुद्द्यावरू काय गोंधळ होईल हेही आपण पाहिलंय. हा गोंधळ केवळ भारतातच नाही तर परदेशातील संसदेतही होतोच. यूरोपमधील स्लोवेनिया देशातील एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. इथे एका खासदाराला सुपरमार्केटमधून सॅंडविच चोरी करणे महागात पडले आहे. या चोरीमुळे येथील संसदेत खासदाराविरोधात जोरदार विरोध झाला. नंतर खासदाराने त्याचा चोरीची कबुली दिली.
स्लोवेनिया येथील सत्ताधारी पक्षाचे खासदार दारची क्रेजिसिच गेल्या आठवड्यात संसदेत देशातील सुव्यवस्थेवर होत असलेल्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी या सॅंडविच चोरीचा उल्लेख झाला. तेव्हा खासदार दारजी यांनी सांगितले की, 'सॅंडविच घेताना सुपरमार्केटमधील कोणताही कर्मचारी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता. त्यामुळे काही वेळ वाट पाहून मी पैसे न देताच बाहेर आलो'.
जसा याबाबत संसदेत उल्लेख झाला तेव्हा विरोधी पक्षातील आणि सत्ताधारी पक्षातील काही लोकांना त्यांचा जोरदार विरोध केला. अनेक सदस्यांनी ही गोष्टी चुकीची असल्याचं सांगितलं. आपल्याला होणारा विरोध पाहून खासदार दारजी यांनी स्वत: त्यांचा राजीनामा स्पीकरकडे सोपवला.
दारजी यांनी संसदेत स्वत: त्यांचा गुन्हा मान्य केला. पण त्यांनी हेही सांगितले की, हे त्यांचं एक सोशल एक्सपरिमेंट होतं. याचा उद्देश चर्चेदरम्यान सभागृह सदस्यांना सर्विलांस सिस्टमच्या टेस्टिंगबाबत सांगणे हा होता. तसेच त्यांनी हेही सांगितले की, नंतर ते त्याच दिवशी सुपरमार्केटमध्ये सॅंडविचचे पैसे देण्याकरीता गेले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दारजी हे ५ महिन्यांपूर्वीच खासदार झाले होते. संसदेत त्यांचा विरोध झाला असला तरी सोशल मीडियातून त्यांच्या इमानदारीचं कौतुक करण्यात आलं. तर काही लोकांनी त्यांची खिल्लीही उडवली.