नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचं थैमान देशभरात सुरूच आहे. या दुसऱ्या लाटेत ज्याची कधी कुणी कल्पनाही केली नव्हती अशा धक्कादायक घटना बघायला मिळाल्या. कोरोनामुळे आपलेच लोक आपल्याच लोकांना बघू शकत नाही, त्यांच्या जवळ जाऊ शकत नाहीत. यापेक्षा दुर्दैवी अजून काय असावं. डॉ. दीपशीखा घोष यांनी ट्विटरवर त्यांना आलेला एक असाच हृदय पिळवटून टाकणारा अनुभव ट्विटरवर शेअर केलाय. त्यांना आलेला हा अनुभव असा आहे की, नुसतं वाचून डोळे पाणावतील. तर विचार करा तिथे त्या असताना त्यांची काय स्थिती झाली असेल. त्यांनी एका आईचा आणि मुलाचा अनुभव सांगितला.
दीपशीखा यांनी केलेली ट्विटरवरील पोस्ट व्हायरल झाली आहे. दीपशीखा यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'माझी शिफ्ट संपत असताना मी एका कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना फोन केला ज्या शेवटच्या घटका मोजत होत्या. आम्ही हे हॉस्पिटलमध्ये वागतो. काहींच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करतो. या रुग्णाच्या मुलाने आमच्याकडे काही वेळ मागितला. कारण त्याला शेवटच्या घटका मोजत असलेल्या त्याच्या आईसाठी गाणं गायचं होतं.'
त्यांनी पुढे असं लिहिलं आहे की, या मुलाने आईसाठी 'तेरा मुझसे है पहले का नाता कोई..' हे गाणं गायलं. मी तिथेच फोन पकडून उभी होते आणि त्याच्याकडे बघत होते. ते चित्र पाहून नर्सही तिथे स्तब्धपणे उभ्या राहिल्या. गाता गाता त्याला मध्येच रडू कोसळलं पण तरी त्याने गाणं पूर्ण केलं. त्याने त्यांच्या तब्येतीविषयी विचारलं, माझे आभार मानले आणि फोन ठेवला'.
दीपशीखा यांनी पुढे लिहिले की, 'त्यानंतर मी आणि काही नर्स तिथेच उभ्या होतो. आम्ही आमचं डोकं हलवलं, आमच्या डोळ्यात पाणी होतं. नंतर नर्सेस त्यांच्या पेशंट्सकडे गेल्या. मुलाने आईसाठी गायलेल्या गाण्यानं गाण्यानं आम्हाला बदलून टाकलं आहे, निदान मला तरी. हे गाणं आता नेहमीसाठी माझ्या लक्षात राहील'.