शनिवारी (दि.१४) वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढतीची उत्सुकता ‘एव्हरेस्ट’सारखी शिगेला पोहोचली होती. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखोंच्या साक्षीने रोहित शर्माच्या भारतीय संघाने पाकिस्तानची एकतर्फी लढतीत ७ गडी राखून धूळधाण केली. यासह विश्वचषकात ३१ वर्षांत आठव्यांदा विजयी घोडदौड कायमही राखली. पाकिस्तानचा ४२.५ षटकांत १९१ धावांत धुव्वा उडविल्यानंतर विजयी लक्ष्य ११७ चेंडू आधी ३०.३ षटकांत ३ बाद १९२ असे गाठले.
दरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यातील शानदार सामन्याची संधी कुणालाही सोडायची नसते. क्रिकेट चाहते असो किंवा मार्केट, या संधीचा फायदा घेण्यासाठी प्रत्येकाने आपापली तयारी केली होती. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १ लाखांहून अधिक लोकांनी हा सामना पाहिला, तर काही चाहत्यांनी स्टेडियमबाहेर म्हणजेच आपल्या घरातही या सामन्याचा आनंद लुटला. तसेच, या सामन्यात केवळ स्टेडियमच नाही तर रेस्टॉरंट, बार, पब, स्विगी या सर्वांनी भरपूर कमाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान स्विगीकडून प्रचंड विक्री करण्यात आली. स्विगीने सांगितले की, काही तासांतच त्याच्या इन्स्टामार्टमधून हजारो कंडोम विकले गेले. ऑनलाइन ग्रोसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी इंस्टामार्टला सामन्यादरम्यान ३५०९ कंडोमची ऑर्डर मिळाली. याशिवाय, स्विगी-झोमॅटोकडून दर मिनिटाला शेकडो बिर्याणी, मिठाई, चॉकलेट्स आणि चिप्सची ऑर्डर करण्यात आली.
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान जवळपास ३५०९ कंडोमच्या ऑर्डर स्विगी इंस्टामार्टवर मिळाल्या होत्या. स्विगीनेच फेसबुकवर ही माहिती दिली आहे. स्विगीने पोस्टमध्ये लिहिले की, '३५०९ कंडोम ऑर्डर देण्यात आल्या, आज काही खेळाडू मैदानाबाहेर खेळत आहेत. किमान ते खेळत आहेत, त्यांनी पाकिस्तानप्रमाणे आत्मसमर्पण केलेले नाही.' ज्यावर ड्युरेक्स इंडियाने लिहिले, 'आम्ही आशा करतो की, सर्व ३५०९ जणांनी संस्मरणीय परफॉर्मेंससोबत फिनिश केले असेल.' या सामन्यादरम्यान लोकांनी केवळ कंडोमच नाही तर मोठ्या प्रमाणात बिर्याणीची ऑर्डर केली होती.
स्विगीने शनिवारी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान दर मिनिटाला २५० पेक्षा जास्त बिर्याणीच्या ऑर्डर मिळाल्या. सामना सुरू झाल्यापासून स्विगीला दर मिनिटाला २५० बिर्याणीच्या ऑर्डर देण्यात आल्या. तसेच, कंपनीने सांगितले की, चंदिगडमधील एका कुटुंबाने एकाच वेळी ७० बिर्याणी ऑर्डर केल्या. असे वाटत होते की आधीच उत्सव साजरा करत होते. याशिवाय, भारतीयांनी सामन्यादरम्यान १ लाखांहून अधिक कोल्ड्रिंक्स ऑर्डर केले होते. तसेच, सामन्यादरम्यान ब्लू लेज, ग्रीन लेजची जवळपास १०,९१६ आणि ८,५०४ पॅकेट्सची ऑर्डर देण्यात आली होती.