आयडियाची कल्पना! ...म्हणून तिनं महागड्या कारवर थापलं शेण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 05:45 PM2019-05-21T17:45:56+5:302019-05-21T17:46:26+5:30
गुजरातमधील महिलेनं संपूर्ण कारवर शेण थापलं
अहमदाबाद: उन्हाचा कडाका वाढल्यानं अनेक जण विविध युक्त्यांचा वापर करत आहेत. पुण्यात एका सिग्नलजवळ उन्हापासून बचाव करण्यासाठी शेड तयार करण्यात आलं आहे. तर अहमदाबादमधील एका महिलेनं संपूर्ण कारला शेण थापलं आहे. सध्या या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रुपेश गौरांग दास नावाच्या व्यक्तीनं फेसबुकवर शेण थापलेल्या कारचे फोटो शेअर केले आहेत. गायीच्या शेणाचा मी पाहिलेला सर्वोत्तम वापर, असं दास यांनी लिहिलं आहे. आपण अहमदाबादमध्ये हे फोटो टिपल्याचं त्यांनी म्हटलं. '45 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करण्यासाठी आणि कारमधील उष्णता कमी करण्यासाठी सेजल शहा यांनी त्यांच्या कारवर शेण थापलं आहे,' असं दास यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये शहा यांच्या कारचे दोन फोटो दिसत आहेत. त्यात संपूर्ण कारवर शेणाचा थर दिसत आहे.
शेण थापलेल्या कारची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. ही कार पाहून सोशल मीडियाला अनेक प्रश्नदेखील पडले आहेत. कारवर थापण्यात आलेल्या शेणाच्या दुर्गंधानं त्रास होत नाही का, थापण्यात आलेल्या शेणाचं आच्छादन किती सेंटिमीटरचं आहे, असे प्रश्न सोशल मीडियावरील काहींनी उपस्थित केले आहेत. ग्रामीण भागात जमीन सारवण्यासाठी शेणाचा वापर होतो. याशिवाय भिंतीवरही गोवऱ्या थापल्या जातात. त्यामुळे थंडीत घरातली हवा ऊबदार राहते. तर उन्हाळ्यात गारवा मिळतो. याशिवाय शेणामुळे डासांचा त्रासदेखील कमी होतो.